दिंडोरी : सोबत दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनींच मित्राचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (दि.23) रोजी समोर आलेल्या या घटनेचा पोलिसांनी छडा लावत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक गांगोडे (रा. शिवाजीनगर, दिंडोरी) याचा शनिवारी वनारवाडी शिवारात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याचा तपास सुरू केला असता दीपक हा सायंकाळच्या सुमारास घरातून बाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने आई रंजना गांगोडे यांनी कॉल करून विचारले असता दहा मिनिटात घरी येतो तसेच ओझर येथील मित्र मंगेश पावडे व अक्षय कुवर यांच्यासोबत सांगितल्याचे सांगितले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास केले असता संशयित दोन्ही मित्रांनी दारू प्यायल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून मारहाण केल्याने शरीरातील आतील भागात रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर संशयितांनी त्यास त्याच अवस्थेत दुचाकीवरून दिंडोरीरोड लगत वनारवाडी शिवार आणून टाकल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतिश परदेशी करीत आहेत.