

नाशिक / नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने केलेल्या कारवाईत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार संशयितांना ताब्यात घेण्यात यश आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल 28 धारदार चाकू, कोयते, दोरी आदी साहित्य जप्त केले. वेळीच झालेल्या या कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्ह्यांना आळा बसला आहे. गुरुवारी (दि. २१) रात्री ९.३० च्या सुमारास ही कारवाई झाली.
पळसेचे पोलिसपाटील सुनील गायधनी यांनी ११२ क्रमांकावर फोन करीत, गावात काही संशयास्पद तरुण असल्याची माहिती कळविली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक सक्रिय झाले. त्यांनी मध्यरात्री पळसे गावातील ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मकाच्या शेतामध्ये संशयितांचा शोध घेतला.
यावेळी पोलिसांना बघताच पाच जणांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत, पथकाने चौघांच्या मुसक्या आवळल्या, तर एक पसार होण्यात यशस्वी झाला. रविकुमार भोई (२७, रा. मराठी मंदिर झोपडपट्टी, अंबरनाथ, कल्याण), शिवा विक्रम वैदू (३६, रा. आनंदनगर, जळगाव), विष्णू शंकर भोई (३०, रा. टायगर गाव, कल्याण फाटा, ता. ठाणे) आणि आकाश गोपाळ वैदू (३८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, पाचोरा, जि. जळगाव) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचा साथीदार श्याम विष्णू भोई (रा. आसवनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिक) हा अंधाराचा फायदा घेऊन निसटला.
यावेळी पथकाने संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून तब्बल २८ धारदार चाकू, धारदार कोयता, मिरचीची पूड व सुती दोरी मिळून आली. त्यावरून ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची खात्री पटली. हवालदार विशाल पाटील यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदीप पवार करीत आहेत.