

नाशिक : गुरुपाल सिंह सेठी ऊर्फ राजा यांच्या हत्येप्रकरणी वर्षभरापासून फरार असलेल्या मायलेकाला अखेर अटक करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले आहे. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणातील संशयित आरोपी शरणसिंह गिल याला बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणी एकुण चार संशयित आरोपी असून, त्यापैकी तिघांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
फिर्याद आभिजित गुजराल यांनी वर्षभरापूर्वी मुंबई नाका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२४ साली गुरुपाल सिंह सेठी उर्फ राजा हे मनजितकौर चड्डा, तेजकिरत सिंह चड्डा यांच्यासोबत राहत होते. घरात सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांवरून, कौटुंबिक वादांवरून सतत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या तणावात गटातील मृत व्यक्ती गुरुपाल सिंह सेठी उर्फ राजा याचा मानसिक छळ केला गेला. ७ जुलै २०२४ रोजी गुरुपाल सिंह सेठी उर्फ राजा मृतावस्थेत सापडले होते. मृत्यू संशयास्पद म्हणून दाखवला गेला, परंतु फिर्यादी यांना यामागे भलतेच काहीतरी असल्याचा संशय आला. त्यांनी पोलीसांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, 'हा साधा मृत्यू नव्हे, हा संगनमताने केलेला मानसिक छळ व खून आहे'. पोलिसांनी तपास सुरू ठेवत संबंधितांना नोटीसा बजावल्या. मात्र, संशयित आरोपींपैकी सर्व जण फरार होते. अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने यापैकी शरणसिंह गिल याला काही दिवसांपूर्वी बेड्या ठोकल्या होत्या.
त्यानंतर या प्रकरणातील संशयित मनजितकौर चड्डा व तिचा मुलगा तेजकिरत सिंह यास मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आता या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्याने, तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष नेरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ करीत आहेत.