

नाशिक : मेफेड्रोन (एमडी) तस्करी प्रकरणात सहभागी गुन्हेगारांशी संपर्क ठेवल्याप्रकरणी पोलिस कर्मचारी युवराज शांताराम पाटील याला पोलिस आयुक्तालयाने बडतर्फ केले आहे. यापूर्वी त्याचे निलंबन झाले होते. मात्र, तो चौकशीला सामोरा न गेल्यामुळे त्याला फरार घोषित करून अखेर बडतर्फी झाली आहे. पोलिस तपासात, 'एमडी' प्रकरणातील गुन्हेगार छोटी भाभी, अर्जुन पिवाल, सागर शिंदे आणि इरफान उर्फ चिपड्या तसेच गोवंश तस्करांसोबत पाटील नियमित संपर्क राहिल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहर पोलिसांनी २०२३ साली वडाळा गावातील 'छोटी भाभी'च्या घरातून 'एमडी'चा साठा जप्त केला होता. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या तपासात शहर पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याचा सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी संबंधित कर्मचारी युवराज पाटील यास निलंबित करीत तपासाचे आदेश दिले. पाटील याचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी काही गुन्ह्यात पाटील यास सहआरोपी केले. त्यामुळे अटक टाळण्यासाठी पाटील याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान, निलंबित केल्यापासून पाटील फरार असून, तो चौकशीसाठी येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाने त्यास बडतर्फ केले आहे.
पोलिसांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये वडाळा गावात कारवाई करीत एमडी तस्कर वसीम रफीक शेख (३६) व नसरीन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (रा. सादिकनगर, वडाळागाव) यांना अटक केली. सखोल तपासात छोटी भाभीचा पती इम्तियाज शेख, तसेच भिवंडीतून सलमान अहमद फलके, ठाणे शहरातून शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजीज मेमन, कसारातून सद्दाम सारंग यांचीही धरपकड झाली. इरफान उर्फ चिपड्या शेख (रा. सादिकनगर, वडाळा), करण सोनटक्के (रा. नाशिक रोड) यांनाही गतवर्षी अटक झाली. तसेच नाशिक रोड येथील सनी पगारे व अर्जुन पिवाल यांनाही अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक केली. यापैकी मुख्य संशयितांसोबत पाटीलचा फोनवरून संपर्क असल्याचे निष्पन्न झाले. संशयितांसोबत संशयित पाटील याने सुमारे अकराशे वेळा फाेन वरून संपर्क साधल्याचे तपासात उघड झाले.