

नाशिक : नाशिकच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने छोटी भाभीच्या घरातून गत वर्षी ५ ऑक्टोबर रोजी झोपडीतून ५४.४ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) सह एक किलो गांजा असा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी शहर पोलिसांनी सुमारे वर्षभरानंतर पुन्हा सखोल तपास करीत दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे याप्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमली पदार्थविरोधी पथकाने गतवर्षी वसिम रफिक शेख (३६) व नसरिन ऊर्फ छोटी भाभी इम्तियाज शेख (रा. सादिकनगर, वडाळा गाव) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दोन लाख रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. सखोल तपासात ड्रग्ज पेडलर सलमान फलके, शब्बीर ऊर्फ आयना अब्दुल अजिज मेमन, छोटी भाभीचा पती इम्तियाज या संशयितांनाही अटक झाली. मुंबईतून ड्रग्ज आणून शहरात विक्री होत असल्याचे तपासात उघड झाले होते. दरम्यान, छोटी भाभीचे राजकीय लागेबांधे असल्याचा आरोप करीत 'मोठी भाभी'चीही चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी केली होती. तर अटक केलेले संशयित विरोधकांशी संबंधित असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपामुळे हे प्रकरण बरेच गाजले.
कालांतराने या प्रकरणाचा तपास थंडावला होता. मात्र, वर्षभरानंतर शहर पोलिसांनी पुन्हा तपास सुरू केला आहे. त्यात संशयित इरफान शेख नूर मोहम्मद शेख (रा. वडाळा) याच्यासह करण सोनटक्के (रा. नाशिक रोड) यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) अटक केली आहे. त्यापैकी इरफान यांची सत्ताधारी आमदारासोबत जवळीक असल्याची चर्चा आहे. या दोघांना अटक केल्यानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी पकडलेल्या सहा संशयितांकडील चौकशीतून या दोघांची नावे समोर आलीत. संशयित करण हा गांजाच्या व्यवहारात सक्रीय असल्याचे समाेर आले आहे. तर संशयित इरफान शेख हा एमडीचा व्यवहार करणाऱ्यांना पाठबळ देत असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे इरफान याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा रंगली आहे.