

नाशिक : आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या उद्देशाने पोलिस विभागातर्फे गुरुवारी (दि. २१) सायंकाळी विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. मोहिमेदरम्यान सायंकाळी ७ ते रात्री १० पर्यंत तब्बल २३२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी काही सराईतांविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध मोहीम उघडली आहे. त्यानुसार पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ १ मधील सातही पोलिस ठाणे हद्दीत पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त संगीता निकम, नितीन जाधव यांना पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून परिणामकारक कोम्बिंग ऑपरेशन राबविले. रेकॉर्डवरील तब्बल १२७ संशयितांना पोलिस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात आली. हद्दपार असलेल्या गुन्हेगारांपैकी ३२ संशयित गुन्हेगारांना तपासले. त्यापैकी सूरज कांतीलाल वर्मा (२४, रा. रेणुका रेसिडेन्सी दत्तात्रयनगर, अमृतधाम) या संशयित हद्दपार आरोपीविरुद्ध मपोका कलम १४२ अन्वये कारवाई झाली.
पंचवटी व भद्रकाली पोलिस ठाणे हद्दीत बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणारे रेकॉर्डवरील एकूण ३१ गुन्हेगारांचीही तपासणी झाली. त्यांची घरझडती घेतली असता, पंचवटी हद्दीतील संशयित आरोपी पीयूष रामदास सोनवणे (१९, रा. अवधूतवाडी) व भद्रकाली हद्दीतील संशयित आरोपी कैलास कुंभकर्ण ऊर्फ मुन्ना कासार (२३, रा. भद्रकाली) यांच्याकडे घातक हत्यार मिळून आले. त्यांच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ सह मपोका कलम १३५ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. यावेळी ४२ फरार आरोपीदेखील चेक करण्यात आले.
शहरात अचानकपणे कोम्बिंग, ऑल आउट, नाकाबंदी आदी कारवाया करून सराईत गुन्हेगारांवर कारवाई केली जाणार आहे. घरझडत्या तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून परिणामकारकपणे कारवाई केली जावी, असे स्पष्ट आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत.
रेकॉर्डवरील, शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्हे कारणारे - १२७
हद्दपार गुन्हेगार - ३२
पाहिजे/फरारी - ४२
शस्त्र अधिनियमाखालील - ३१