

नाशिकरोड : परिसरात दरोडा घालणारे सहा संशयित, गावठी कट्टा बाळगणारा सराईत गुन्हेगार व मामाच्या घरात चोरी करणारा चोरटा या तीन गुन्ह्यांची उकल करत नाशिकरोड पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.
परिसरातील सुभाष रोड, भारती मठ येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगाराच्या घरावर हल्ला करणाऱ्या १२ संशयितांपैकी सहा संशयितांना काही तासांतच ताब्यात घेण्यात आले. सराईत गुन्हेगार अनेकत जॉन केरला व आदित्य जारस यांच्यासोबतच्या जुन्या वादातून हा प्रकार घडला. धारदार शस्त्रांसह परिसरात दहशत निर्माण करून रोकड हिसकावणे, घराच्या दारावर व रिक्षांवर वार करून तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान एकलहरे रोडच्या किर्लोस्कर टेकडीजवळ संशयित लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धनंजय मस्के, मयूर जानराव, तुषार सावंत, हृषिकेश पवार, अभिनव जाधव व एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील चार लोखंडी कोयते व चॉपर जप्त करण्यात आला.
उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील फर्नांडिसवाडी गोळीबारातील मुख्य संशयित रोहित गोविंद डिंगम हा गोरेवाडी परिसरात गावठी कट्टा विक्रीसाठी आला असता, नाशिकरोड पोलिसांनी सापळा रचत त्याला पकडले. त्याने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी गावठी कट्टा व काडतूस जप्त करण्यात आले.
नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीतील जाखुरी गावात घराची कौले काढून कपाटातील २२ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र व सहा हजार रोख अशी चोरी झाली होती. तपासादरम्यान हा संशयित कुटुंबातीलच असल्याचा अंदाज पोलिस हवालदार विजय टेमगर यांनी बांधला आणि तो खरा ठरला. या प्रकरणात फिर्यादीच्या बहिणीचा मुलगा महेश गोपाल अनवट (२१, रा. जाखुरी) याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २२ तोळ्याच्या मंगळसूत्रासह रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत गुन्ह्यांची सख्या वाढत असली, तरी उकलही तेवढ्या प्रमाणात होत असल्याने पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी नाशिकरोड पोलिसांचे कौतुक केले. सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, सुनील बिडकर, पोलिस हवालदार विजय टेमगर, विशाल पाटील आदींनी या गुन्ह्यांची उकल केली.