

नाशिक : पेठ रोडवरील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून प्रमुख संशयित विकी वाघ व विकास वाघ व त्याचे साथीदार अद्यापही फरार आहेत.
पंचवटी गुन्हेशोध पथक त्यांचा शोध घेत आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेला सागर जाधव याची प्रकृती गंभीर आहे. पेठ रोडवरील राहुलवाडी येथे (दि.१७) मध्यरात्री सुमारास पूर्व वैमनस्यातून जाधव हल्ला झाला होता. यात दोन गोळ्या लागल्याने जाधव हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील संशयित व जखमी हे दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. दोघांवरही नाशिकमधील पोलिस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी अधिक तपास पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुनील पवार करीत आहेत.