

पंचवटी (नाशिक) : मखमलाबाद शिवारातील तवलीच्या डोंगरावर नागपंचमी निमित्त नागोबा मंदिरात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी भाविकांची एकच गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दर्शनासाठी आलेल्या चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लांबविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास म्हसरूळ पोलिस करीत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मखमलाबाद शिवारातील तवली डोंगरावर नागोबा देवतेचे मंदिर आहे. नागपंचमी निमित्त या ठिकाणी दरवर्षी यात्रा उत्सव साजरा केला जातो. यासाठी पंचक्रोशीतून भक्त, भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याच गर्दीचा फायदा चोरटे उचलतात. मखमलाबाद शिवारातील बऱ्याच महिला दर्शनासाठी या नागोबा मंदिरात आल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्या. सोनसाखळी लांबविल्याचे लक्षात येताच या चार महिलांनी म्हसरूळ पोलिस ठाणे गाठत सर्व हकिगत सांगितली. यातील काही महिलांना अश्रू अनावर झाले होते. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
म्हसरूळ – मखमलाबाद शिवाराचा दिवसागणिक विकास होत असून नागरी वस्तीत देखील मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्याची स्थापना झाली. त्यावेळी असलेली लोकसंख्या आज पटीने वाढली आहे. पोलिस मनुष्यबळ देखील कमी पडत आहे. पोलिस ठाणे हद्दीत होणाऱ्या घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाढती गुन्हेगारी यास पायबंद घालण्याची वेळ आली असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
नागोबा देवी, देवतांच्या मंदिरात भक्त भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत सोनसाखळी चोरी झाली आहे. लवकरात लवकर तपास करून चोरांच्या मुसक्या आवळण्यात येतील. सध्या गुन्हे शोध पथक चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न करीत आहेत.
अंकुश चिंतामण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ पोलीस ठाणे