

देवगाव (नाशिक) : गोदावरी नदीपात्रात वाहून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. पंचाळे (ता. सिन्नर) येथील सागर रामनाथ मोरे (३२) याचा हा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दि. १७ जुलैला गोदावरी नदीपात्रातून एक मृतदेह वाहून जाताना नागरिकांच्या निदर्शनास आला. चांदोरी येथील आपत्कालीन बचाव समितीने मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीच्या जोरदार प्रवाहामुळे ते अपयशी ठरले. शनिवारी (दि. १९) सकाळी ६ च्या सुमारास ब्राह्मणवाडे शिवारात नदीपात्रात मृतदेह आढळला. पोलिसपाटील सोमनाथ पितळे यांनी सायखेडा पोलिसांना खबर दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करत, मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. बेपत्ता व्यक्तींचा आढावा घेताना सागर मोरे याचा मृतदेह असल्याचे समोर आले. सहायक पोलिस निरीक्षक विकास ढोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.