

नाशिक : नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या ५७ वर्षाच्या नराधमास जिल्हा व सत्र न्यायालयात सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अंबड पोलिस ठाणे हद्दीत २ ऑगस्ट २०२२ ला घडली होती.
आरोपी ज्ञानेश्वर त्रंबक पाटील ऊर्फ पाटील बाबा (रा. मुक्तानंंद शाळेजवळ, महाराणा प्रताप चौक, सिडको) याने पीडिताला रस्त्यात अडवून फिर्यादी राहत असलेल्या परिसरातील घराच्या पाठीमागील बाजूला नेत लैंगिक अत्याचार केले होते. तसेच 'तुला वडील नाहीत आणि तू जर हा प्रकार तुझ्या आईला सांगितल्यास, तुला व तुझ्या आईला मारून टाकेन. पोलिसांना सांगितल्यास तुझ्या घरातील सर्वांना संपवून टाकेन' अशी धमकी दिली होती. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बालकांचचे लैंगिक शोषण अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलमांसह अनुसूचित जाती अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास अंबड विभागाचे तत्कालिन पोलिस आयुक्त सोहेल शेख यांनी केला होता. त्यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून, गुन्हा शाबित होण्याच्या दृष्टीने तपास केला. तसेच जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
बुधवारी (दि.१०) याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले यांच्यासमोर सुनावणी झाली. सदर गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध फिर्यादी, साक्षीदार, पंचांची साक्ष व तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास ग्राह्य धरून, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ९, १० अन्वये दोषी धरत सात वर्षे सश्रम कारावास व ५० हजारांचा दंड, दंड न भरल्यास एक वर्षे साध्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर खटल्यास सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण व सुप्रिया गोरे यांनी पुराव्यांची मुद्देसूद मांडणी व प्रभावी युक्तिवाद केला. तसेच पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, हवालदार आर. बी. आजगे, राजश्री बोंबले यांनी गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला.