

लासलगाव (नाशिक) : जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत आयशर, पिकअपसह शासकीय रेशन धान्याचा सुमारे २५ लाख ७ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा विंचूर मध्ये कारवाई करत २५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. मात्र लासलगाव पोलिसांना याबाबत माहिती नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार (दि. 27) रोजी रात्री 8.30 वाजता विंचूर–निफाड रोडवरील देवकी लॉन्सजवळ स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीणचे पथक गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. राहुल राजेंद्र कर्पे (वय 35, रा. पांडुरंग नगर, विंचूर, ता. निफाड) हा दोन वाहनांमध्ये शासकीय रेशनसदृश गहू-तांदळाची अवैधरित्या वाहतूक करताना पोलिसांच्या हाती रंगेहाथ सापडला.
सरकारी माल जप्त
या कारवाईत जप्त आयशर टेम्पो (क्र. MH-15 JC-9117) किंमत 15 लाख रुपये, 200 पोते सरकारी तांदूळ (85 पोत्यांवर महाराष्ट्र शासनाची अधिकृत मुद्रा), एकूण किंमत 3.60 लाख रुपये, मोठा लोखंडी इलेक्ट्रॉनिक वजन काटा, किंमत 2 हजार रुपये, महिंद्रा पिकअप (क्र. MH-15 GV-9117) किंमत 6 लाख रुपये, 45 पोते गहू, किंमत 45 हजार रुपये असे एकूण जप्त मालाची किंमत अंदाजे 25 लाख 7 हजार रुपये इतकी आहे.पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतून (PDS) लाभार्थ्यांना देण्यात येणारे तांदूळ व गहू आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवले होते.
या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 अन्वये फिर्यादी सचिन धारणकर, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.