

नाशिक : शहरात दररोज चोरीचे गुन्हे घडत असल्याचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. १ ते १३ डिसेंबर या अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत शहरातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे तब्बल १३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मात्र, यातील बहुतांश गुन्ह्यांची उकल अद्याप झालेली नाही.
गेल्या तीन महिन्यांत पोलिस असल्याचे सांगत फसवणूक केल्याचे १६ पेक्षा अधिक गुन्हे तपासातच अडकून पडले आहे. सराईत चोरटे चोरीचा मुद्देमाल विकून मोकाटपणे फिरत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या घटनांमध्ये ५५ ते ८० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांनाच लक्ष्य केले जात आहे.
अलीकडील काही दिवसांत शहरातील विविध भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पादचारी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्यात आले. एका तरुणाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेण्यात आला. एका प्रकरणात मारहाण करत लूट करण्यात आली आहे. या घटनांप्रकरणी पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अमृतधाम परिसरातील प्रतिभा रमेश चौधरी (७०) या शुक्रवारी फेरफटका मारत असताना औदुंबरनगर कॉलनी रस्त्यावर दुचाकीवरील चोरट्यांनी सव्वालाख रुपये किमतीची पोत हिसकावून नेली. द्वारका परिसरात आर. बी. दम्बिवाल आणि त्यांचा मित्र लादुरा रनवा यांना तिघांनी एकास मारहाण करत मोबाईल आणि २२ हजार रुपये रोख लुटले. गंगापूर रोड परिसरात राजश्री नवले यांच्या गळ्यातील दोन लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळवले. भारतनगर भागात एका डिलिव्हरी बॉयचा २५ हजार रुपयांचा मोबाईल दुचाकीस्वारांनी हिसकावून नेला.