

नाशिक : 'कमी व्याजदराने कर्ज देत कमी किंमतीत फ्लॅट खरेदी करून देतो' अशा स्वरुपाचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल १८ लाख ९६ हजार ४४२ रुपये किंमतीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
अंबड पोलिस ठाणे हद्दीतील ज्येष्ठ नागरिकास 'कमी व्याजदरात कर्ज काढून देत, कमी किंमतीत फ्लॅट खरेदी करून देतो' अशाप्रकारचे आमिष दाखवत कोऱ्या धनादेशावर फिर्यादीची स्वाक्षरी घेत धनादेश सराफाच्या खात्यावर वटवून सोने घेत संशयित पसार झाले हाेते. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञातांविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा उघड करण्याच्या अनुषंगाने अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत तसेच पोलिस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, मयूर पवार, अंमलदार केशव ढगे, फरीद इनामदार, सचिन वाघ, सुवर्णा सहाने असे पथक तयार केले गेले. अंमलदार पवार यांनी सहा दिवस नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील ५० पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपीचा येण्याजाण्याचा मार्ग शोधून काढला. पथकाने प्राप्त फुटेज बातमीदारांना दाखवून संशयित आरोपींची ओळख पटवली. संशयित लपून बसलेल्या ठिकाणी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण १३४.९८० ग्रॅम सोन्याचे नाणे, वेढणी तसेच दोन दुचाकी, मोबाइल असा १८ लाख ९६ हजार ४४२ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.