

कळवण (नाशिक) : वडिलोपार्जित शेतजमीन मोजणी अहवाल तयार करून सादर करण्याच्या मोबदल्यात तीन हजारांची लाच स्वीकारताना येथील नगर भूमापक लिपिक विजय हनुमंत गवळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी ६९ वर्षीय मजूर तक्रारदाराच्या फिर्यादीवरून कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदाराच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची मोजणी झाली होती. त्याचा अहवाल तयार करून सादर करण्याच्या मोबदल्यात नगर भूमापक लिपिक विजय हनुमंत गवळी (४३, रा. नम्रता रो हाउस, बोरगड, नाशिक) यांनी बुधवारी (दि. ३०) आठ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी तीन हजार रुपये भूमिअभिलेख कार्यालयात गुरुवारी (दि. ३१) दुपारी ४.३० च्या सुमारास स्वीकारताना 'एसीबी'च्या पथकाने गवळीला पकडले.