नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन दिवसांत वाहनांची जाळपोळ व तोडफोड केल्याचे प्रकार घडले आहेत. याप्रकरणी पाच गुन्हे दाखल केले असून, त्यातील बहुतांश गुन्हेगारांची ओळख पटली असून, पोलिस तपास करीत आहेत. कौटुंबिक व इतर कारणांमुळे गुन्हेगारांनी जाळपोळ-तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या घटनेत सातपूर येथील श्रमिकनगर परिसरात शुक्रवारी (दि.1) मध्यरात्री दीड वाजता घराबाहेरील दोन दुचाकी वाहनांना पेटवून नुकसान केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी बाळासाहेब सर्जेराव पवार (58, रा. श्रमिकनगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा जावई कुणाल कैलास गायखे (23, रा. ता. सिन्नर) याने घरासमोरील एमएच 15 एटी 4788 व एमएच 15 एफई 8882 क्रमांकाच्या दोन दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळपोळ केल्याची फिर्याद सातपूर पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस तपास करीत आहेत.
दुसर्या घटनेत गंजमाळ येथील देवी मंदिरासमोर अज्ञात व्यक्तीने शनिवारी (दि.2) मध्यरात्रीतून धनराज अशोक वाघ (35,रा. गंजमाळ) यांच्याकडील एमएच 15 सीसी 2777 क्रमांकाच्या दुचाकीची जाळपोळ केली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे.
तिसर्या घटनेत संशयित अनिकेत गिते (23, रा. नाशिक रोड) याने नाशिक रोड येथील गंधर्वनगरी परिसरात एमएच 05 बीएल 4923 क्रमांकाच्या कारची काच फोडली. तसेच परिसरातील संग्राम बिंदुमाधव फडके (46, रा. गंधर्वनगरी) यांना दमदाटी करीत जीवे मारण्याची धमकी दिली. संग्राम यांनी आरडाओरड केल्याने संशयित अनिकेत पळून गेला. शनिवारी (दि. 2) मध्यरात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात संशयित अनिकेतविरोधात गुन्हा दाखल आहे.
मखमलाबाद येथील शांतीनगर परिसरात एकाने शनिवारी (दि. 2) मध्यरात्री तीनच्या सुमारास चायनीज हातगाडी व शेडची जाळपोळ केली. रामदास माधव नाईक (65, रा. शांतीनगर) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रथमेश दत्तात्रय जाधव (23, रा. शांतीनगर) याने ज्वलनशील पदार्थ टाकून हातगाडी व शेडची जाळपोळ करून 30 ते 40 हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात प्रथमेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक रोड रेल्वेस्थानकाबाहेरील आंनद जनरल स्टोअर्स येथे संशयित प्रतीक शिंदे, बंटी जमदाडे यांनी शनिवारी (दि. 2) सकाळी सातच्या सुमारास तोडफोड केली. संशयितांनी दुकानाबाहेरील वडापावची हातगाडी उलटी करीत कोयत्याने कामगार जशमुद्दीन शेख यांच्याकडे सिगारेट मागत दुकानाच्या काउंटरवरील काचा फोडून दहशत केली. तसेच तक्रार दिली तर पाहून घेऊ, अशी धमकी देत दोघे पळून गेले. याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात विनोद भगत यांनी दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.