

नाशिकरोड : रेल्वे स्थानकाच्या वेटिंग रूममध्ये प्रवाशाचा महागडा मोबाइल चोरणाऱ्या विधिसंघर्षित बालकाला अवघ्या चार तासांत ताब्यात घेण्याची कामगिरी नाशिकरोड लोहमार्ग पोलिसांनी केली.
चोरी गेलेला मोबाइलदेखील पोलिसांनी हस्तगत केला. विजय रॉय (३२, रा. गणेश चौक, नाशिक) हे नाशिक ते बंगळुरू प्रवासासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकातील वेटिंग रूममध्ये थांबले होते. यावेळी त्यांच्या बॅगेत असलेला मोबाइल अनोळखी व्यक्तीने नकळत चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दाखल केली होती. पोलिस तपासात आढळले की, मुलगा पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये काम करत असून, तो घरातून न सांगता नाशिकरोड रेल्वेस्थानकात आल्याचे आढळले. प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाचे आदेश दिले. सहायक फौजदार संतोष दत्तात्रय उफाडे- पाटील यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासून वर्णनाशी मिळत्याजुळत्या विधिसंघर्षित बालकाला ओळखले आणि अवघ्या चार तासांत त्याला ताब्यात घेतले.