

नाशिक : निखिल रोकडे
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या १०० दिवसांत तब्बल ४२ लाचखोरीच्या प्रकरणांवर कारवाई केली आहे. या कारवायांमध्ये ६५ शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि खासगी नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एसीबीच्या कारवायांना गती मिळाली आहे.
शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच काही ठिकाणी खासगी व्यक्तींकडून लाच मागण्याच्या घटनांवर विभागाने कठोर भूमिका घेतली असून संबंधितांवर गुन्हे नोंदवले आहेत. नाशिक विभागात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या सर्व जिल्ह्यांतील विविध शासकीय कार्यालयांवर एसीबीने कारवाई केली आहे. महसूल, पोलिस, नगरपरिषद, ग्रामपंचायत, वीज वितरण आणि आरोग्य विभाग यांसारख्या महत्त्वाच्या शासकीय संस्थांतील भ्रष्टाचार प्रकरणांचा यात समावेश आहे. सतत वाढणाऱ्या भ्रष्टाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी एसीबीच्या वाढत्या कारवायांमुळे काही प्रमाणात प्रतिबंध घातला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात आणि नागरी संस्थांमध्ये लाच मागण्याचे प्रकार वारंवार घडत असले तरी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या त्वरित आणि प्रभावी हस्तक्षेपामुळे या प्रवृत्तीवर नियंत्रण मिळत आहे.
भ्रष्टाचाराविरुद्धच्या या लढ्यात नागरिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. नागरिकांनी जागरूक राहून अशा घटनांची माहिती दिल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नाशिक एसीबी विभागाने नागरिकांसाठी हेल्पलाइन क्रमांक, ईमेल आणि विशेष तक्रार यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. लाच मागणाऱ्या कोणत्याही अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी किंवा खाजगी व्यक्तीबाबत माहिती दिल्यास तक्रारदाराची गोपनीयता पूर्णपणे राखली जाते.
वर्ग- आरोपी संख्या
१- १
२- ६
३- ३२
४- ०३
इतर- ११
खासगी -१२
एकूण- ६५
लाच मागणी संदर्भात सजग व जागृत राहावे - कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास आमच्या विभागाशी अथवा तात्काळ टोल फ्री क्रं. १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
भारत तांगडे, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक