

नंदुरबार : सेवानिवृत्त झाल्यानंतरही तब्बल 21 महिने महसूल कार्यालयात अनधिकृतपणे बसून जमीन प्रकरणांशी संबंधित कागदपत्रे हाताळणाऱ्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एका माजी जिल्हाधिकाऱ्यासह काही बडे कारभारी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्ह्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.
काही आठवड्यांपूर्वी आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा यांनी नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील महसूलच्या जुन्या इमारतीवर अचानक छापा टाकून झाडाझडती घेतली होती. यावेळी सेवानिवृत्त असलेला मंडळ अधिकारी झाकीर एम. पठाण हा कार्यालयात नियमितपणे बसून जमिनीच्या नोंदी करत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून सुमारे 700 हून अधिक फाईल्स आणि हजारो कागदपत्रे जप्त करण्यात आली.
नंदुरबारमध्ये महसूल विभागात कार्यरत अधिकाऱ्यानेच महसूल कार्यालयावर छापा टाकण्याची ही पहिलीच घटना होती. या छापेमारीचे वृत्त ‘पुढारी’ या दैनिकातून सर्वप्रथम प्रसिद्ध झाले होते. मात्र, यानंतर अनेक आठवडे उलटल्यानंतरही काय पुरावे सापडले आणि कोणते घोटाळे उघडकीस आले याचा अधिकृत खुलासा झाला नव्हता.
सेवानिवृत्त झालेला मंडळ अधिकारी नियमितपणे कार्यालयात येऊन महत्त्वाची शासकीय कागदपत्रे हाताळत होता, हे तब्बल पावणेदोन वर्षे चालले तरीही तहसीलदार ते जिल्हाधिकारी या कोणत्याही अधिकाऱ्याने याची दखल घेतली नाही, हे प्रश्न निर्माण करणारे आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठी साखळी कार्यरत असावी का? यासंदर्भात विविध चर्चा सुरू आहेत.
काल बुधवार (दि.२५) रोजी रात्री ११ नंतर, नितीन रमेश पाटील (वय ४१), नायब तहसीलदार, तहसील कार्यालय नंदुरबार (रा. हरी ओम कॉलनी, नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात झाकीर एम. पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, पठाण यांनी सेवानिवृत्तीनंतरही शासकीय अधिकारी असल्याचे भासवत महसूल विभागातील महत्त्वाची कागदपत्रे बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवली. यात तलाठी कार्यालय, मंडळ कार्यालयाशी संबंधित दस्तऐवज, माजी जिल्हाधिकारी श्री. बालाजी मंजुळे यांच्या सह्या असलेले/नसलेले वादग्रस्त आदेश, तसेच इतर महागडी वस्तू यांचा समावेश आहे.
झाकीर एम. पठाण यांच्यावर शासकीय अधिकारी असल्याचे भासवून शासन व नागरिकांची दिशाभूल केल्याचा, शासकीय दस्तऐवज बेकायदेशीरपणे हाताळल्याचा आणि शासकीय मालमत्तेचा गैरवापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.