

नंदुरबार : जुन्या वादातून शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीस नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयाने 6 वर्ष सश्रम कारावास आणि 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावातील मंगलसिंग ठाणसिंग गिरासे (वय 50) हे 22 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी त्यांच्या शेतात जनावरांसाठी लोखंडी खूंटी टाकत असताना, त्याठिकाणी प्रकाश रोहीदास कोळी (रा. रजाळे) हा हातात लोखंडी कोयता घेऊन फिरत होता. यावेळी दोघांमध्ये चार वर्षांपूर्वीचा जुन्या वाद होता. अचानक प्रकाश कोळी याने मंगलसिंग गिरासे यांच्यावर कोयत्याने वार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी जखमी मंगलसिंग यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार यांनी आरोपीस अटक करून आवश्यक पुरावे गोळा केले. नंतर दोषारोपपत्र सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. पेठकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता अॅड. बी. यू. पाटील यांनी कामकाज पाहिले. साक्षीदार, पंच व तपास अधिकाऱ्यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सबळ पुराव्याच्या आधारे आरोपी प्रकाश रोहीदास कोळी यास भारतीय दंड संहितेच्या कलम 307 अन्वये दोषी ठरवत 6 वर्ष सश्रम कारावास व 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, नितीन साबळे, पंकज बिरारे, राजेंद्र गावीत आणि शैलेंद्र जाधव यांनी पैरवी अधिकारी व अंमलदार म्हणून काम पाहिले. तर तपास अधिकारी व सरकारी वकील यांच्या कामगिरीचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी काम केले.