

मुंबई : गोवंडी येथे दोन पोलिसांवर सहा ते सात गर्दुल्ल्यांनी प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात पोलीस शिपाई योगेश सुधाकर सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार अशोक भालेराव जखमी झाले असून त्यांच्यावर चेंबूरच्या सुराणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सात संशयितांना देवनार पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या आरोपींमध्ये अफान ऊर्फ बिल्डर, साहिबेआलम सावंत ऊर्फ डॅनी, जिशान खान ऊर्फ जिशू, शोएब खान ऊर्फ गबरु, कैफ, शमशू आणि जिदान ऊर्फ जॅकी यांचा समावेश असल्याचे बोलले जाते. गोवंडी परिसरात रात्री ड्रग्ज तस्करीसह सेवन करण्याचे प्रमाण जास्त असल्याने देवनार पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. शनिवारी रात्री साडेदहा वाजता अशोक भालेराव व योगेश सूर्यवंशी हे गोवंडीतील बाळासाहेब ठाकरे उद्यानाजवळ गस्त घालत होते. यावेळी तिथे त्यांना काही तरुण ड्रग्जचे सेवन करताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी तिथे कारवाई करुन तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांना पोलीस ठाण्यात नेत असताना त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही पोलिसांवर दगडासह चाकूने हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात योगेश सूर्यवंशी व अशोक भालेराव हे दोघेही जखमी झाले. यानंतर देवनार पोलिसांनी तिथे धाव घेतली. यावेळी जखमी पोलिसांना चेंबूरच्या सुराणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
याप्रकरणी योगेश सूर्यवंशी यांच्या जबानीवरुन पोलिसांनी सातही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गस्त घालणाऱ्या पोलीस पथकावर गर्दुल्ल्यांकडून झालेल्या हल्ल्याच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे आदेश देवनार पोलिसांना दिले होते. या आदेशांनतर पळालेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली होती.