

मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून ती गरोदर असल्याचे समजताच तिला जबलपूर रेल्वे स्थानकात सोडून भामट्या प्रियकराने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन देवनार पोलिसांनी आरोपी प्रियकराविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. पळून गेलेल्या प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. १६ वर्षांची पीडित मुलगी कल्याण येथे राहते. १९ वर्षांचा आरोपी तिच्या परिचित असून गेल्या जानेवारी महिन्यापासून ते दोघेही एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. ती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याने तिला प्रपोज करून लग्नाचे आमिष दाखविले होते.
गोवंडीतील राहत्या घरी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. जानेवारी २०२४ ते मे २०२५ या कालावधीत त्याने अनेक दा लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जबदस्तीने अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिली होती. त्यानंतर ते दोघेही त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र जबलपूर रेल्वे स्थानकात तिला सोडून आरोपी प्रियकर पळून गेला.
प्रियकर पळून गेल्याचे लक्षात येताच पीडित मुलगी जबलपूर येथून तिच्या राहत्या घरी आली. त्यानंतर तिने देवनार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी प्रियकराविरुद्ध तक्रार केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आर-ोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. पीडित मुलीला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथेच तिची वैद्यकीय चाचणी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.