

मालेगाव (नाशिक) : शहर, परिसरासह पिंपळगाव, चांदवड, निफाड, कळवण, नांदगाव, पंचवटी आदी ठिकाणांहून 30 दुचाकी तसेच धरणगाव येथून ट्रॅक्टर चोरी करणार्या चोरट्यांच्या टोळीचा छडा लावण्यात पवारवाडी पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले.
या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या 18 लाख रुपये किमतीच्या 30 दुचाकी व तीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असा 21 लाखांचा ऐवज जप्त केला. या चोरट्यांच्या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या कारवाईत शहेजाद सय्यद एकबाल, युसुफ शेख अय्युब, शेख नाजीम अब्दूल हमीद, प्रल्हाद उर्फ भूषण प्रमोद वाघ व देवीदास नानाजी वाघ या पाच संशयीतांना अटक केली.
पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे शहेजाद सय्यद (रा. सलमताबाद) व शेख युसुफ (रा. गुलशेरनगर) यांनी पवारवाडी पोलिस ठाणे हद्दीत दुचाकी चोरी केल्याचे बातमी मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने सवंदगाव फाटा परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकी चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक केली. अधिक चौकशीत त्यांनी त्यांचे साथीदार शेख नाजीम (रा. रौनकाबाद), प्रल्हाद वाघ उर्फ भूषण व देवीदास वाघ (रा. सवंदगाव) यांनी मिळून शहर परिसरासह जिल्ह्यात विविध ठिकाणांहून 30 दुचाकी तसेच धरणगाव येथून ट्रॅक्टर चोरी केल्याचे सांगितले. यातील 12 दुचाकी स्वतःकडे ठेवल्या आणि 10 दुचाकी न्हानू जाधव याला विक्री केल्याचे सांगितले. त्यांच्या ताब्यातून 18 लाख रुपये किमतीच्या 30 दुचाकी व तीन लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर असा 21 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पाचही जणांविरोधात पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधू, सहायक अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खताळ, सहायक निरीक्षक किरण पाटील, हवालदार राकेश उबाळे, संतोष सांगळे, नीलेश कदम, जाकीर पठाण, उमेश खैरनार, विनोद चव्हाण, नवनाथ शेलार, सचिन राठोड आदींनी ही कारवाई केली.
शहर व परिसरात सोनसाखळी व दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. मागील दोन महिन्यांत पोलिसांनी दोन वेळा दुचाकी चोरट्यांच्या टोळीला जेरबंद केले. कॅम्प व तालुका पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायांत सुमारे 33 दुचाकी जप्त केल्या होत्या. दुचाकी चोर वेळोवेळी हाती लागत असले, तरी सोनसाखळी चोरांचा माग काढणे पोलिसांना अद्यापही शक्य झालेले नाही.