

नाशिक : शहर व परिसरात चेनस्नॅचिंगच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, दररोज अशा प्रकारचे गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांत नोंदविले जात आहेत. या गुन्ह्यातील अशाच दोन सराईतांना इंदिरानगर गुन्हे शोध पथकाने पाठलाग करून बेड्या ठोकल्या. हे दोघेही संशयित गुन्हेगार परराज्यातील आहेत.
शहरात चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटना लक्षात घेत, पोलिसांकडून सतर्कता बाळगली जात आहे. शहरातील विविध भागांमध्ये पेट्रोलिंग केले जात असून, संशयितांवर स्टॉप ॲण्ड सर्चची कारवाई केली जात आहे. विशेषत: टवाळखोरांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहेत. त्यानुसार इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाकडून स्टॉप ॲण्ड सर्च आणि टवाळखोरांवर कारवाई केली जात आहे.
शुक्रवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास इंदिरानगर पोलिसांनी चेन स्नॅचिंग आणि टवाळखोरांवर कारवाई केली असताना गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक संतोष फुंदे, अंमलदार सागर परदेशी, योगेश जाधव, सागर कोळी, अंमलदार अमोल कोथमिरे, जयलाल राठोड, प्रमोद कासुदे हे गुन्हे शोध वाहनांसह गस्त घालत असताना वडाळा गाव परिसराकडून रविशंकर मार्गाकडे जाताना मदिना लॉन्स, वडाळा गावाजवळ काळ्या रंगाची दुचाकी वडाळा गावाकडून डीजीपीनगरच्या दिशेने जाताना आढळली. विनानंबर प्लेट या दुचाकीवर हेल्मेट घातलेल्या दोन व्यक्ती होत्या. तसेच त्यांनी मास्क व टोपी घातलेली होती. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने, गुन्हे शोध पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना दुचाकी थांबविण्यास सांगितले. मात्र, पोलिसांना बघून त्यांनी दुचाकीने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी थरारकपणे त्यांचा पाठलाग करून, गतिरोधकावर दुचाकीचा वेग कमी होताच त्यांच्या मुसक्या आवळल्या.
त्यांची चौकशी केली असता, गेल्या ५ ऑगस्ट रोजी उपनगर पोलिस ठाणे हद्दीत सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी एक चेनस्नॅचिंग केल्याची कबुली दिली. ते शहरात चेनस्नॅचिंग उद्देशाने आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एकट्या महिलेच्या शोधात ते होते. मात्र, इंदिरानगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे मयूर दिनेश बजरंगे (४०) व जिग्नेश उर्फ जुगनू दिनेश घासी (४२, दोघेही रा. छारानगर, कुबेरनगर, रेल्वेस्थानक, सरदारग्राम, अहमदाबाद, गुजरात) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातील विनानंबरप्लेट दुचाकी, मास्क, तीन टोप्या, मोबाइल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
दोन्ही संशयित हे आंंतरराज्यीय टोळीचे सदस्य असून, त्यांच्यावर महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या राज्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. ते दोघेही तब्बल १८ गुन्ह्यांमध्ये सहभागी असून, त्यांच्याकडून शहरातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्या दृष्टीने शोध घेतला जात आहे.