

अशोक मोराळे, पुणे
सोमवारी सकाळचे अकरा वाजले होते. खराडी येथील मुळा-मुठा नदीपात्रात एका महिलेचे डोके, हात-पाय तोडून टाकलेले धड आढळून आले होते. खून करणार्याने आपलं काम चोख बजावलं होतं. त्यातच शहरात धो-धो पाऊस कोसळत होता. दुथडी भरून वाहणार्या मुळा-मुठेतून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू होता. नदीपात्राचा परिसर मोठा असल्यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. दोन दिवस तपास केल्यानंतरदेखील ठोस असे पोलिसांच्या हाती काही लागले नाही.
चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार गजानन पवार हे खराडी मार्शल कर्तव्यावर होते. एका व्यक्तीने त्यांना माहिती दिली. खराडी मुळा-मुठा नदीवरील जुना पुल सर्व्हे नंबर 70 यूआर वॉटर फ्रंट शेजारी, रिव्हर प्रोटेक्शन बेल्ट येथे एक मृतदेह वाहून आला आहे. पवार आणि त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. जेनी कन्स्ट्रक्शनच्या मागे वॉटर फ्रंट सोसायटीच्या पाठीमागे नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असलेला त्यांना दिसून आला. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पवार यांनी पाहणी केली. अंदाजे 18 ते 30 वय असलेल्या तरुणीचा तो मृतदेह असावा, असा कयास पोलिसांनी बांधला. धक्कादायक म्हणजे, मृतदेहाचे दोन्ही हात खांद्यापासून वेगळे करण्यात आले होते. दोन्ही पाय खुब्यापासून तोडून टाकले होते, तर मुंडकेदेखील गायब होते.
पोलिसांनी परिसरात मृतदेहाचे इतर अवयव शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते मिळून आले नाहीत. त्यानंतर विच्छेदनासाठी मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. प्रथमदर्शी मृतदेहाच्या अवस्थेवरून कोणीतरी धारदार शस्त्राने खून करून, पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे पोलिसांनी ओळखले होते. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केला होता. पोलिसांना आता मृतदेहाची ओळख पटविण्यापासून ते मारेकर्याचा माग काढायचा होता.
एकीकडे जोरात कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे विस्तीर्ण नदीपात्र या दोन्हींचा सामना करत पोलिसांना महिलेचे इतर अवयव शोधायचे होते. त्यासाठी त्यांनी ड्रोनची मदत घेतली. शंभर किलोमीटर नदीपात्र परिसरात मॅपिंग करण्यात आले. पाणबुड्यांनादेखील पाचारण करण्यात आले. सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी केली. गेल्या काही दिवसांत शहरातून अपहरण, बेपत्ता असलेल्या महिलांचे रेकॉर्ड तपासले. महिलेबाबत माहिती देणार्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. परंतु, फारसे सकारात्मक असे काही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नव्हते. आता खरेतर पोलिसांच्या कसोटीचा हा काळ होता.
शवविच्छेदन अहवालात डॉक्टारांनी पोलिसांना सागितले होते की, खून झालेली महिला उंचीने कमी आहे. तिला पाठीचे कुबड असून, ती अविवाहित आहे. दुसरीकडे तांत्रिक विश्लेषणात ती महिला वापरत असलेल्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन भैयावाडी परिसरात मिळून आले होते. पोलिसांच्या हाती आता काही तरी धागा लागला होता. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांना त्यांच्या पथकाने ही माहिती दिली. पोलिसांचं काम काही प्रमाणात का होईना फत्ते झालं होतं. वाघमारे कसलेले अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांच्या पथकाने आपलं लक्ष आता भैयावाडीवर केंद्रित केलं होतं. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे कोणी एखादी महिला येथे राहत होती का, अशी विचारणा स्थानिकांना केली. त्यावेळी एका महिलेने सकिना नावाची एक महिला आमच्या वस्तीत राहते; पण दोन-तीन दिवसांपासून ती बेपत्ता आहे, असे सांगितले. याचबरोबर त्या महिलेनं आणखी एक महत्त्वाची माहिती पोलिसांना दिली. तिचा भाऊ सकिनासोबत खोलीवरून वाद करत होता.
एकीकडे पोलिसांच्या हाती एक कडी लागली होती, तर दुसरीकडे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एका तरुणीने तिची मावशी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. महिलेचा मृतदेह मिळाल्याचा कालावधी आणि बेपत्ता महिलेची तक्रार यामध्ये बरेच साम्य होते. तरुणीने आपल्या तक्रारीत मावशीत आणि मामामध्ये संपत्तीवरून वाद होता, असे सांगत संशय व्यक्त केला होता. पोलिसांना आता खून झालेल्या महिलेची ओळख पटली होती. सकिना अब्दुल खान (वय 41, रा. नरवीर तानाजीवाडी, शिवाजीनगर) असे तिचे नाव होते. पोलिस निरीक्षक वाघमारे थेट भैयावाडीत धडकले. त्यांनी सकिनाच्या भावाची बायको हमीदा खान हिला ताब्यात घेतले. तिचा नवरा अश्पाक खान हा घरी नव्हता. हमीदा काही केल्याने बोलायला तयार नव्हती. साळसुदाप्रमाणे ती आव आणत होती. महिला असल्याने तिला बोलतं करायला पोलिसांना अडचणी येत होत्या. शेवटी पोलिसांनी आपलं भावनिक शस्त्र बाहेर काढलं. याचवेळी तिला सांगण्यात आले की, तुझ्या नवर्यालादेखील अटक केलीय. अखेर पोलिसांसमोर ती जास्त काळ टिकू शकली नाही. नवर्याने आणि तिने मिळून सकिनाचा कसा काटा काढला, याचा पाढा वाचण्यास तिने सुरुवात केली.
अश्पाक आणि सकिना हे दोघे सख्खे बहीण-भाऊ, सकिना अविवाहित होती. नरवीर तानाजीवाडी येथील भैयावाडी येथे पाच बाय बाराच्या खोलीत अश्पाक आणि वहिनी हमीदा यांच्यासोबतच ती राहत होती. अश्पाकच्या आईने ही खोली सकिनाच्या नावावर केली होती. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. 23 ऑगस्टच्या रात्री अश्पाकची पत्नी हमीदा आणि सकिना यांच्यात वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की, रागात अश्पाक याने सकिनाचा गळा घोटला. त्या दिवशी शहरात तुफान पाऊस कोसळत होता. यामुळे शेजार्यांनादेखील याची कुणकुण लागली नाही. सकिनाला कायमचे शांत केल्यानंतर दोघांनी धारदार हत्याराने तिचे हात आणि पाय खुब्यापासून वेगळे केले. तर मुंडकेदेखील तोडून टाकले.
शांत डोक्याने दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली. सकिनाच्या मृतदेहाचे तुकडे दोघांनी वेगवेगळ्या पिशव्यांत भरले. सर्वकाही दोघांच्या भल्यावर होते. पावसामुळे मुळा-मुठा नद्यांना पूर आला होता. ती संधी साधत अश्पाक याने मृतदेहाच्या पिशव्या संगमब्रिज येथून नदीपात्रात फेकून दिल्या. दुसरीकडे, चंदननगर पोलिसांनी अश्पाकला ताब्यात घेतले होते. सुरुवातीला आपण काहीच केले नसल्याचे त्याने सांगितले. मात्र, पोलिसी खाक्यापुढे त्याचा जास्तवेळ टिकाव लागला नाही. शेवटी त्यानेदेखील आपल्या कृत्याची कबुली पोलिसांपुढे दिली. गुन्हेगार कितीही चलाख आणि शातीर असला, तरी तो शेवटपर्यंत पोलिसांच्या नजरेतून सुटू शकत नाही हे मात्र नक्की!