

डोंबिवली (ठाणे): जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वूमीवर जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी अंमली पदार्थांची खरेदी-विक्रीसह तस्करीचे जाळे तोडून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांनुसार अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकाने गुरूवारी दिवसभरात तिघा बदमाशांच्या नांग्या ठेचल्या. दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तिघा गांजा तस्करांच्या मुसक्या आवळून २९ किलो १७७ ग्रॅम वजनाचा ५ लाख ९९ हजार २०० रूपये किंमतीचा गांज्याचा साठा हस्तगत केला आहे.
कल्याणातील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वालधुनी पुलाजवळ असलेल्या रेल्वे हॉस्पिटल समोरून भरधाव वेगात रिक्षा जात होती. डीसीपी अतुल झेंडे यांच्या खास पथकाने रिक्षाचा पाठलाग करून अन्वर अहमद शेख (५६, रा. सहारा होम्स, मस्कर रोड, गणेश विद्यालया जवळ, टिटवाळा) याला ताब्यात घेतले. झडती दरम्यान या बदमाशाकडून २५ किलो वजनाचा ५ लाख १७ हजार २०० रूपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. या बदमाश्याच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २२ (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या कारवाईत पोलिसांच्या खास पथकाने खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उल्हास ब्रिजजवळ शहाड-मोहने रोडला रेहान हमीद शेख (२२) आणि इस्माईल अख्तर शेख (२५) या दोघांची गठडी वळली. हे दोघेही बदमाश जालना जिल्ह्याच्या घनसांवगी तालुक्यातील मु. पो. रांजणी गावचे रहिवासी आहेत. या दुकलीकडून ४ किलो १७७ ग्रॅम वजनाचा ८२ हजार रूपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. त्यांच्याविरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याचे कलम ८ (क), २० (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विरोधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिस परिमंडळ ३ हद्दीतील आठही पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी कारवाईची जोरदार मोहिम उघडण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखुजन्य विक्री करणाऱ्या पानाच्या टपऱ्या आणि दुकानांवर COPTA प्रमाणे कारवाई करून एकूण १०५ जणांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. स्थानिक पोलिसांसह संयुक्तपणे अंमली पदार्थ, सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ विक्री विरूध्द कारवाई सुरू राहणार असल्याने अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.