Jalgaon Chopda Ganja Smuggling | चोपड्यात 4 लाखांचा 19 किलो गांजा जप्त
जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद वनक्षेत्रात वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन संशयितांना अटक केली आहे. संशयित आरोपींकडून १९ किलो ९१८ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त गांजाची अंदाजित किंमत ३ लाख ९८ हजार रुपये आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडावद वनक्षेत्रात गस्त घालणाऱ्या वनकर्मचाऱ्यांना एका मोटारसायकलवरून संशयास्पद हालचाल करणारे दोन इसम आढळल्याने त्यांना थांबवून चौकशी केली असता, त्यांच्या जवळ गांजा असल्याचे समोर आले. त्यामुळे वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ अडावद पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कारवाईसाठी पथक बोलावले.
राजपत्रित अधिकाऱ्याच्या उपस्थितीत पंचनामा करण्याच्या नियमानुसार, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे अनिल भवारी यांना यावेळी पाचारण करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत गांजा आणि मोटारसायकल जप्त करत सविस्तर पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणात अडावद येथील वनपाल शितल माळी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ हे पुढील तपास करत आहेत. चंदुलाल सोनवणे, भूषण चव्हाण तसेच सरकारी पंच व फॉरेन्सिक व्हॅनच्या उपस्थितीत प्रकरणाचा तपास व सीलिंग प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

