

जळगाव : चोपडा शहरात ८ किलो १३० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची वाढती तस्करी व सेवन रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव) व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप (चोपडा) यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या होत्या.
रविवार (दि.20) रोजी रात्री ८.३० वाजता पोलीस हवालदार रविंद्र पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली, त्यानुसार दोन इसम काळ्या रंगाच्या बजाज पल्सरवरून गलंगी गावाकडून चोपडा शहरात गांजाची अवैध वाहतूक करत असल्याचे समोर आले. या माहितीनुसार विष्णु बिन्हाडे, रविंद्र पाटील आणि दीपक माळी यांनी गलंगी गावात तर जितेंद्र वल्टे, विलेश सोनवणे यांनी चोपडा शहरात पाळत ठेवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत आरोपींची मोटारसायकल थांबवली. यावेळी दुचाकीवर मागे बसलेला इसम उडी मारून पळून गेला. जितेंद्र वल्टे यांनी १५० ते २०० मीटर धावत पाठलाग करून संशयितास ताब्यात घेतले.
तपासादरम्यान, ९० हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एमएच १८ बीडब्ल्यू ८०३५), ८.१३० किलो गांजा (मूल्य १.२१ लाख), आणि ५१ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २ लाख ६२ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक, तसेच चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे आदींनी ही कारवाई पार पाडली.