

Jalgaon Amphetamine Drugs Seized Case
जळगाव : चाळीसगाव येथे २४ जुलै रोजी ६४ कोटी ९० लाख ५ हजार रुपयांचे ‘एम्फेटामाईन’ (Amphetamines) नावाचे अमली पदार्थ जप्त केल्यानंतर या प्रकरणातील तपासात मोठा खुलासा झाला आहे. तपासासाठी गेलेल्या पोलिस पथकाने तामिळनाडू येथून महालिंगम नटराजन (वय ६२, रा. विलुदामावडी, नागापट्टम) याला शुक्रवार (दि.१ ऑगस्ट) रोजी अटक केली आहे. हे ड्रग्स श्रीलंकेमार्गे विदेशात पाठवले जाणार होते, असा पोलिसांना संशय आहे.
जप्त केलेला साठा सुझुकी ब्रेझा (क्रमांक DL 09 CB 7771) या चारचाकी वाहनातून मिळाला होता. वाहनात ४३ किलो २६७ ग्रॅम वजनाचे एम्फेटामाईन आढळले होते. वाहन चालवत असलेला अब्दुल आसीम अब्दुल आला सय्यद (वय ४८, रा. दिल्ली) याला घटनास्थळीच अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके दिल्ली, बेंगळुरू, मध्य प्रदेश व तामिळनाडू येथे पाठवण्यात आली. महालिंगम नटराजन याला तामिळनाडूतून न्यायालयीन प्रक्रियेनंतर अटक करण्यात आली असून बुधवार (दि. ६ ऑगस्ट) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अब्दुल आसीम अब्दुल आला सय्यद (वय ४८, रा. ओखला, नवी दिल्ली) यास २५ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. तर महालिंगम नटराजन (वय ६२, रा. ता. किझवेलुर, तामिळनाडू) याय १ ऑगस्ट २०२५ रोजी अटक करण्यात आले. त्याचप्रमाणे योगेश महालिंगम, (रा. तामिळनाडू (नटराजन यांचा मुलगा) आणि दोन अनोळखी इसम यांचा पोलीस तपास घेत होते.
महालिंगम नटराजनवर १२, तर त्याचा मुलगा योगेशवर ३ गुन्हे दाखल असून, हे दोघेही पिता-पुत्र आहेत. नटराजन हा पूर्वी गावाचा सरपंच राहिलेला आहे. त्याची आई राधामणी देखील सरपंच होती. दुसरा मुलगा अॅलेक्स सध्या नारकोटिक्स विभागाच्या कोठडीत आहे.
महालिंगम व अब्दुल असीम यांची ओळख चेन्नईतील वकिलामार्फत झाली होती. ड्रग्सचा साठा दिल्लीहून तामिळनाडूत विलुदामावडी येथे पोहोचवायचा होता. अब्दुल याला एका ‘ट्रिप’साठी १५ लाख रुपये दिले जाणार होते. ही रक्कम हवालामार्गे मिळणार होती.
सदर साठा कर्नाटक–तामिळनाडू सीमेवर महालिंगमकडे सुपूर्द होणार होता. पुढे केवळ १५ किमी अंतरावर श्रीलंका सीमारेषा असल्याने, अमली पदार्थ समुद्रमार्गे श्रीलंकेत पाठवले जाण्याचा पोलिसांना संशय आहे.
अब्दुल असीम याने कारच्या तपासणीवेळी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांपूर्वीच त्याने ही नवीन कार घेतली होती.
या गुन्ह्यातील सर्व आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व त्यांचे पथक पुढील तपास करत आहेत.