

नाशिक : शरणपूर रोड येथील सुमती सोसायटीत असलेल्या कुंथूनाथ जैन मंदिरातील देवाच्या चांदीच्या व पंचधातुच्या मूर्ती तसेच पुजेची भांडी व दोन दान पेट्या लंपास करणाऱ्या तीघा चोरट्यांना गुन्हेशाखेच्या युनिट एकने जेरबंद केले आहे. त्यांच्या तीन लाख ५८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.
मनीष जीवनलाल मोदी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा अतिसंवेदनशील व धार्मिक असल्याने, पोलिस आयुक्तांनी सूचना दिल्या होत्या. त्यातच गुन्हे शाखा युनिट एकचे हवालदार प्रशांत मरकड, अंमलदार अमोल कोष्टी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने चोरीची भांडे एका गोणीमध्ये घेवून दोन इसम दुचाकीवरून चांदशी गावाकडून आसाराम बापू पुलावरून नाशिककडे येणार असल्याचे समजले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांना माहिती दिली असता, त्यांनी कारवाईचे आदेश दिले. गुन्हेशाखा युनिटचे उपनिरीक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, हवालदार प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण, विशाल काठे, मिलिंदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, रोहिदास लिलके, अंमलदार अमोल कोष्टी, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे आदींच्या पथकाने आसाराम बापू पुलाजवळ सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी, विशाल बाळू सांगळे (२३, रा. राहुलनगर, वेदमंदिराच्या मागे, त्र्यंबकेश्वर रोड) व शिवा गोपाळ डोंगरे (२३, रा. कामगार नगर, सातपूर) असे सांगितले. त्यानंतर त्यांची झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आला. तसेच त्यांनी व त्यांचा साथीदार संशयित लकी विल्सन भंडारे (१९, रा. ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड) यांनी जैनमंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला एकुण एक लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेली ८० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा दोन लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
तिन्ही संशयित आरोपींकडे विचारपूस केली असता, त्यांनी यापूर्वी गंगापूर रोड, जेहान सर्कल येथील स्वामी डेव्हलपर्स ऑफिसमध्ये रोख रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्या ताब्यातून ६४ हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून, गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच त्यांच्या ताब्यात मिळून आलेले चांदीचे भांडी व मोबाइल फोन असे एकुण ६४ हजार पाचशे रुपये किंमतीचा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला. या मुद्देमालाबाबत तपास केला असता, गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल असलेला आणखी एक गुन्हा उघडकीस आला आहे.