

आशिष शिंदे, कोल्हापूर
मल्टिनॅशनल कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या आदित्यच्या बाबतीत ही घटना घडली. बाजारपेठेत गर्दीत त्याचा महागडा आयफोन अचानक चोरीला गेला. फोनमध्ये महत्त्वाचा डेटा, बँक खात्यांचे तपशिल आणि ऑफिसचे प्रेझेंटेशन्स असल्याने आदित्य प्रचंड पॅनिक झाला होता. त्याने तातडीने मित्राच्या फोनवरून 'फाईंड माय आयफोन'द्वारे लोकेशन ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला; पण चोरट्यांनी फोन आधीच स्विच ऑफ केला होता. फोन हरवल्याच्या विवंचनेत आणि चिंतेत आदित्यचे दोन दिवस गेले. अशातच मंगळवारी सकाळी त्याच्या दुसऱ्या नंबरवर 'सपोर्ट' च्या नावाने एक अधिकृत दिसणारा टेक्स्ट मेसेज आला की "तुमचा हरवलेला आयफोन ट्रॅक झाला असून, तो सध्या ऑनलाईन आहे. तुमचे अचूक लोकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.’’
तो मेसेज पाहून आदित्यच्या जिवात जीव आला. त्याने घाईगडबडीत आणि फोन परत मिळवण्याच्या आशेने त्या लिंकवर क्लिक केले. लिंक ओपन होताच समोर हुबेहूब कंपनीच्या अधिकृत लॉग-इन पेजसारखे दिसणारे एक बनावट पेज ओपन झाले. आदित्यने कसलाही संशय न घेता तिथे आपला आयडी आणि पासवर्ड टाकला. त्यानंतर सायबर चोरट्यांनी मागितलेला ओटीपीदेखील स्क्रीनवर एंटर केला. आदित्यला वाटले की तो फोन रिकव्हर करण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. पण, प्रत्यक्षात तो सायबर चोरट्यांच्या एका अतिशय धोकादायक आणि अत्याधुनिक जाळ्यात अडकला होता. चोरटे त्याच्या त्याच आयफोनच्या चोरीमध्ये सामील होते आणि आता ते डिजिटल पद्धतीने त्याच्या खात्यावर डल्ला मारत होते.
त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत आदित्यच्या पायाखालची जमीनच सरकली. चोरट्यांनी त्याच्या आयडीचा ॲक्सेस मिळवून त्याच्या हरवलेल्या आयफोनमधील 'फाईंड माय' हे सुरक्षा कवच कायमचे डिसेबल केले होते आणि त्या डिव्हाईसवरून त्याचा ॲपल आयडी पूर्णपणे काढून टाकला होता. आता तो आयफोन चोरट्यांसाठी अगदी नवीन फोनसारखा झाला होता, जो ते बाजारात सहज विकू शकत होते. या गुन्ह्याला केंद्रीय गृहमंत्रालयाने हायब्रीड सायबर क्राईम असे नाव दिले आहे. जिथे आधी वस्तूची प्रत्यक्ष चोरी केली जाते आणि नंतर डिजिटल फसवणुकीने त्याची सुरक्षा यंत्रणा तोडली जाते. या नव्या धोक्यापासून वाचण्यासाठी आयफोन युजर्सनी फोन हरवल्यास कोणत्याही अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्लिक करू नये, थेट बँकेत व सीईआयआर पोर्टलवर फोन ब्लॉक करावा आणि संकटसमयी त्वरित १९३० या सायबर हेल्पलाईनचा आधार घ्यावा, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.