

सातपूर (नाशिक) : अंबड लिंक रोड परिसरात बुधवारी (दि.6) रोजी पहाटे गावठी कट्टा विक्रीसाठी येणाऱ्या तरुणाला सातपूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहितीद्वारे सापळा रचून रंगेहाथ पकडत बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवाजी पवार (वय २७, रा. दत्त नगर, चुंचाळे शिवार) असे असून त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला.
पोलिस उपनिरिक्षक बटुळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने बुधवारी पहाटे ही कामगिरी केली. बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास गुन्हे शोध पथकातील पोलिस हवालदार दीपक खरपडे, तुषार देसले, सागर गुंजाळ, मुषण शेजवळ आणि योगेश्वर गायकवाड हे बजरंग नगर परिसरात पेट्रोलिंग करत होते.
त्यावेळी पोलीस सागर गुंजाळ यांना गावठी कट्टा विक्रीसाठी बजरंगनगर ते सातपूर गावाच्या दरम्यान एक तरुण शिवहाइट्स इमारतीजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचला. काही वेळातच एक तरुण तेथे दिसताच पोलिसांनी शिताफीने त्याला वेढा घालून पकडले. अंगझडतीत त्याच्याकडे गावठी कट्टा सापडला. शस्त्र अधिनियमअन्वये सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता ८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.