

लासलगाव (नाशिक) : सुकेणकर चाळ येथे वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढणाऱ्या दोन महिला चोरट्यांपैकी एकीला लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे. जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे तातडीने कारवाई करता आली.
ही घटना सोमवारी (दि. ४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. बाजारतळ परिसरातील सुकेणकर चाळ येथे राहणाऱ्या ७५ वर्षीय इंदुमती दत्तात्रय काळे या घरात एकट्याच होत्या. दोन अनोळखी महिला त्यांच्या घरात शिरल्या. एकीने इंदुबाईंना 'केळी खा' असे सांगत बोलण्यात गुंतवले. तर दुसरी महिला घराबाहेर ये - जा करणाऱ्यांवर लक्ष ठेऊन होती. घरातील महिलेने इंदुबाईंशी झटापट करत त्यांच्या गळ्यातील तीन ग्रॅम वजनाची, सुमारे २८ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावली अन् दोघींनी पळ काढला. इंदुबाईंचा आरडाओरड ऐकून जवळच राहणारे उमेश पारीख यांनी त्वरित सहायक पोलिस निरीक्षक भास्कराव शिंदे यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ तपास सुरू केला. छाया आकाश कुन्हाडे (रा. सुमतीनगर, लासलगाव) या संशयित महिलेला ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत पळून गेलेली तिची सख्खी बहिण पूजा प्रविण कुन्हाडे असल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी इंदुबाई यांचा मुलगा राजेंद्र काळे (रा. भाऊसाहेवनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी छाया आणि पूजा कुन्हाडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फरार पूजा कुन्हाडेचा पोलिस शोध घेत आहेत.