

जळगाव : तालुक्यातील डोमगाव येथील तरुण शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि.7) रोजी म्हसावद रेल्वे गेटजवळ घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आसाराम धनगर (वय ३८, रा. डोमगाव) हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून कर्जबाजारी असल्यामुळे ते तणावाखाली होते. यावर्षी लवकर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट त्यांच्यावर ओढवले होते. या आर्थिक आणि मानसिक तणावातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सोमवारी (दि.7) सकाळी किशोर धनगर यांनी राहत्या घरी जेवण करून शेतात कामासाठी गेले. मात्र काम झाल्यानंतर म्हसावद रेल्वे गेटजवळ त्यांनी धावत्या पुष्पक एक्स्प्रेसखाली उडी घेतली. घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच, त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.
किशोर धनगर यांच्या पश्चात आई सुनंदाबाई धनगर, पत्नी उज्ज्वला, ७ वर्षांचा मुलगा व ५ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. किशोरच्या अचानक जाण्याने परिवारावर दु:खाचे मोठे सावट पसरले आहे. गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक हेमंत जाधव पुढील तपास करत आहेत.