

आशीष शिंदे, कोल्हापूर
Cyber Trap Case
एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर असलेला आदित्य. वयाने पस्तिशीतला, करिअरचा ग्राफ उंचावलेला; पण आयुष्याच्या एका कोपर्यात एकांताची खिन्नता घर करून होती. सोशल मीडियावरील आभासी जगत आणि सुंदर चेहर्यांच्या मायाजालात अडकत त्याने एक डेटिंग अॅप डाऊनलोड केले. तिथेच तो ‘सायबर सापळ्यात’ अडकला.
डेटिंग अॅपवर तिचे नाव होते ‘शेरिन’. बंगळूरची इन्व्हेस्टर असल्याचे सांगत होती. बोलण्यात गोडवा, प्रोफाईलमध्ये आत्मविश्वास आणि संवादात एक वेगळीच जादू. काही दिवसांतच ती त्याच्याशी सवयीने बोलू लागली. एकटेपणावर फुंकर घालणारी कोणीतरी सापडल्याच्या समाधानात तो हरवू लागला.
इन्व्हेस्टमेंटमधून चांगले रिटर्न्स मिळू शकतात, तुला शिकवते असे म्हणत तिने त्याला एका ट्रेडिंग अॅपची लिंक पाठवली. सुरुवातीला 2,900 यूएसडी म्हणजेच जवळपास 2.45 लाख रुपयांची गुंतवणूक. अॅपवर आलेली काही खोटी नफा रक्कम बघून तो भारावून गेला. पुढचे काही आठवडे, रोज नव्या बँक खात्याचे डिटेल्स, नवे गुंतवणुकीचे प्लॅन. टेलिग्रामवरून सतत चॅटस् आणि मोहक स्वप्ने दाखवणारी शेरिन. एकेक व्यवहार करत करत त्याने 31 लाख रुपयांचा आकडा गाठला.
पण अचानक एके दिवशी तो लॉगिन करताच अॅप बंद. शेरिन गायब. टेलिग्रामवर रिप्लाय नाही. काही दिवस वाट बघितली. पण काही उपयोग झाला नाही. आदित्य ‘पिग बुचरिंग स्कॅम’च्या सापळ्यात पुरता अडकला होता.
सध्या डेटिंग अॅप वापरून भावनिक जाळं पसरवायचे आणि ‘क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट’च्या नावाखाली लाखो रुपये उकळण्याचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी सुरू केला आहे. याला रोमँटिक इन्व्हेस्टमेंट स्कॅम किंवा पिग बुचरिंग स्कॅम असे म्हणतात. या फसवणुकीत गुन्हेगार सुरुवातीला डेटिंग अॅप, सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अॅप्सद्वारे एखाद्या व्यक्तीशी भावनिक नातं तयार करतात. एकदा विश्वास बसला की, गुंतवणुकीचे आमिष दाखवून हळूहळू मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात.
सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपवर कोणत्याही ओळखीवर लगेच विश्वास ठेवू नका.
जर कोणी अनोळखी व्यक्ती गुंतवणुकीच्या संधींबद्दल सतत बोलत असेल किंवा ट्रेडिंग अॅप्स, क्रिप्टो यासारख्या टर्म्स वापरत असेल तर सावध व्हा.
ती वेबसाईट किंवा अॅप खरोखर अस्तित्वात आहे का, तिचे रिव्ह्यूज काय आहेत, त्यावरचा परतावा वास्तववादी आहे की अवास्तव, हे प्रथम तपासा.
कुठल्याही व्यक्तीने सांगितलेल्या अज्ञात खात्यावर किंवा क्रिप्टो वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करू नका. विशेषतः जर ती व्यक्ती तुम्हाला प्रत्यक्ष भेटलेली नसेल.
जर कोणतीही शंका आली तर 1930 या सायबर हेल्पलाईनवर कॉल करा.