

जळगाव (एरंडोल): एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन बालकाची निर्घृण हत्या झाल्याच्या प्रकरणात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. ही कारवाई ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त मोर्चा काढल्यानंतर करण्यात आली.
पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, रिंगणगावचे गजानन नामदेव महाजन (वय 45) यांचा मुलगा 16 जून रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह काही दिवसांत सापडला असून, गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केली असून, पुढे तपासात नरबळीच्या कलमांचा समावेशही करण्यात आला आहे. मात्र, यानंतरही ग्रामस्थांनी तपासाबाबत असंतोष व्यक्त करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा. नरबळीचा कलम तपासात समाविष्ट करून कार्यवाही करावी. शेतातील सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या एरंडोल संशयित आरोपी करावे. उज्ज्वल निकम यांची सरकारी अभियोक्ता म्हणून नेमणूक करावी. या प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. यातील तीन मागण्या आधीच मान्य झाल्या असून, उर्वरित दोन मागण्यांसाठी पोलिस प्रशासन शासनाकडे ग्रामस्थ पाठपुरावा करणार आहे.
या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष तपास पथक (SIT) नेमले असून त्यामध्ये काही अधिकारी समाविष्ट आहेत. यामध्ये कविता नेरकर – अपर पोलिस अधीक्षक, चाळीसगाव (पर्यवेक्षण अधिकारी), विनायक कोते – उपविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर. पोलिस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र वल्टे, संदीप पाटील, निलेश गायकवाड, सचिन पाटील , राहुल कोळी या विशेष पथकाकडून तपास अधिक गतीने आणि प्रभावीपणे करण्यात येणार आहे. डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा छडा लावला जाणार आहे. तपासात आधीच नरबळीची कलम समाविष्ट असतानाही मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतरच एसआयटी का स्थापन झाली, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे