

ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू
अंगा लावूनिया राख, डोळे झाकून करिती पाप
दावुन वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा
तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती..!
मूल होत नाही म्हणून मिरज तालुक्यातील अर्जुनवाड येथील एका भोंदूबाबाने सांगलीतील विवाहितेची नग्नपूजा करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना गेल्याच महिन्यात उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकरणातील तिघांनाही अटक केली. मात्र, ही काही पहिलीच घटना नाही, श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा फायदा घेत वर्षानुवर्षे बुवा-बाबांकडून स्त्रियांचे लैंगिक शोषण सुरूच आहे. ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी याविरोधात कायदा व्हावा म्हणून बलिदान दिले. त्यांच्या हत्येनंतर जादूटोणाविरोधी कायदा झाला. परंतु, शासकीय पातळीवर त्याचा प्रसार न झाल्याने असे प्रकार घडतच आहेत.
एखाद्या स्त्रीला मूल होत नसेल, तर समाजामध्ये तिला अजूनही वांझ ठरविले जाते. मूल न होण्याला सर्वस्वी तीच जबाबदार, असे अजूनही समजले जाते. डॉक्टरांकडे जाऊन सर्व उपाय करून थकल्यानंतर मग भोंदूबाबांचा सल्ला घेण्यास लोक सुरू करतात. परंतु, या परिस्थितीत त्या स्त्रीची अवस्था मात्र केविलवाणी झालेली असते. घरात पती, सासू, सासरे यांच्याकडून तिचा छळ सुरू होतो. कोणत्याही धार्मिक कामात तिला बोलावले जात नाही. तिला जवळजवळ वाळीतच टाकण्यात येते. ही आपल्याकडील परिस्थिती आहे. त्यानंतर कोणता तरी बुवा उठतो आणि मूल न होणार्यांना मूल देण्याचे आश्वासन देतो. त्याने सांगितलेले सर्व अंधश्रद्धेचे प्रकार केले जातात. नरबळीपासून ते लैंगिक शोषणाचे सर्व अघोरी प्रकार चालतात.
काही वर्षांपूर्वी वाघमारे बाबाचे प्रकरण प्रसिद्ध झाले होते. लग्न जमत नाही, मूल होत नाही, नोकरी मिळत नाही, अंगावर कोड आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन मुली व महिला वाघमारे बाबाकडे जायच्या. स्त्रियांबरोबर त्यांची माणसे असायची. महाराज आतल्या खोलीत पूजा करीत असे. एकेका महिलेला तो आतमध्ये बोलवायचा आणि ‘योगिनी’ पूजा करावी लागेल, असे तो सांगायचा. 15 वर्षांच्या मुलीपासून ते 60 वर्षांच्या वृद्धेवर त्याने ‘योगिनी’ पूजेच्या नावाखाली बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते.
मूल न झालेल्या स्त्रीला केवळ पोटावर हात फिरवून मूल दिल्याचा दावा गुजरातमधील भावनगरमधील पार्वती माँ ने केला होता. देशाच्या विविध भागांतून टेम्पो भरून लोक भावनगरला जात होते. अशा पद्धतीने दावा करणे हे अवैज्ञानिक आहे. परंतु, अशा भोंदूबाबांवर कारवाई झालेली नव्हती.
संत तुकोबांनीच म्हटले होते, ‘नवसे कन्या पुत्र होती, तरी का करावे लागे पती’... मूल होण्याचे विज्ञान साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकोबांना कळले होते; परंतु आज अनेक शिकलेल्या लोकांना मात्र समजत नाही.
महिलांचे लैंगिक शोषण करणार्या एका प्रसिद्ध बुवावर आधारित ‘आश्रम’ नावाची वेबसीरिज काही दिवसांपूर्वी आली होती. शुद्धीकरणाच्या नावाखाली पुरुषांचे लैंगिक अवयव काढून टाकणे आणि उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुली, महिलांचे लैंगिक शोषण करणे असे घातक प्रकार तो बुवा करीत होता. नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अजून एक प्रसिद्ध ‘बापू’ मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे. अशाप्रकारे वर्षानुवर्षे श्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांचे लैंगिक शोषण सुरूच आहे.
सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथे उपचारांसाठी आलेल्या बुवाने एका विवाहितेवर बलात्कार केला होता. सांगली ‘अंनिस’कडे ही केस आल्यानंतर पोलिसांनी त्या बुवाला अटक केली. जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत महाराष्ट्रात पहिली शिक्षा त्या बुवाला झाली.
मूल होत नसेल तर महिलांचा घरात छळ सुरूच असतो. त्यामुळे एखाद्या भोंदूबाबाचा दरबार भरलेला असेल तर महिला तिथे नाइलाजास्तव; पण हटकून हजेरी लावत असतात. बुवांच्या मधुरवाणीला भुलतात आणि त्यांचे त्या ठिकाणी शोषण सुरू होते. आचार्य प्र. के. अत्रे यांनी ‘वृक्ष तिथे छाया, बुवा तिथे बाया’ असे म्हटले होते. श्रद्धेचा आधार, तर कधी लोकांच्या अगतिक मानसिकतेचा आधार घेऊन वर्षानुवर्षे स्त्रियांचे शोषण सुरूच आहे. अगदी अलीकडे 2023-24 मधील अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील घटना. मुलीच्या अंगात सैतान आल्याचे भासवून एका प्रार्थनास्थळात दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले. अत्याचाराचा व्हिडीओही बनविण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघा नराधमांवर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल केला.
अलीकडेच पुण्यामध्ये गुप्तधन शोधण्यासाठी व मुलगा होण्यासाठी पाच महिलांची नग्नपूजा विधी करून भोंदूबाबाने त्यांच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांनी त्याला अटक केली. परंतु, लोकांच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत अनेक बुवा त्यांचे शोषण करीतच आहेत. अशा बुवांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत.
कलम 11 क नुसार अलौकिक शक्तीच्या आभासातून पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवणे, अवतारी व्यक्ती, पवित्र आत्मा वा पुनर्जन्म या आभासातून लैंगिक शोषण करणे, कलम 11 ख नुसार मूल न होणार्या स्त्रीला अलौकिक शक्तिद्वारा मूल होण्याचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे.