

दशकभरापूर्वी राज्यातील जनतेला ड्रग्जची ओळख ही प्रामुख्याने हिंदी चित्रपटातूनच व्हायची. ही पांढरी पावडर म्हणजे नशेखोरीचा काहीतरी प्रकार आहे, एवढेच समजायचे. पण, गेल्या एक-दोन वर्षांत राज्यातील पुणे, मुंबई, सांगली, औरंगाबाद, नाशिक, चाकण आदी भागांत ड्रग्जचे कारखानेच कारखाने सापडू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी पुडीतून चिमूटभर मिळणारे अमली पदार्थ आजकाल टना-मणाने सापडू लागले आहेत. केवळ शहरी भागच नव्हे, तर ग्रामीण भागातही ड्रग्जने आणि ड्रग्ज तस्करांनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याचे दिसत आहे. हळूहळू हा ‘ड्रग्ज कॅन्सर’ अवघ्या महाराष्ट्राला ग्रासण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाने समाजाला ड्रग्जचे गँगरिन होण्यापूर्वीच कठोर ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत ड्रग्ज तस्करांच्या काही टोळ्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या, काही ड्रग्ज बनविणारे कारखानेही सापडले. पण, राज्यातील ड्रग्जचे हे लोण आता राज्यापुरते मर्यादित राहिलेले नाही; तर इथल्या ड्रग्जचा धूर पार लंडनपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदाची या ड्रग्ज रॅकेटची समूळ पाळेमुळे खणून काढण्याची आवश्यकता आहे; अन्यथा...
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि पुणे हे भाग अलीकडे ड्रग्ज उत्पादन आणि तस्करीच्या घटनांसाठी चर्चेत आले आहेत. शिवाय या ड्रग्ज प्रकरणात गुंतलेल्या लोकांचे पार लंडनपर्यंत संबंध असल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणाने सिद्ध केले की, ड्रग्ज माफियांनी केवळ स्थानिक पातळीवर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले जाळे विणले आहे. ड्रग्ज तस्करीच्या या प्रकरणांनी पोलिस आणि तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. महाराष्ट्रातील ड्रग्ज उत्पादनाची नशा मुंबई, सांगली, कोल्हापूर, पश्चिम बंगाल, कर्नाटक, दिल्लीमार्गे लंडनसह देश-विदेशापर्यंत पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी पुणे परिसरात एक मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. पुण्यात उघडकीस आलेल्या या प्रकरणाने ड्रग्ज तस्करीचा भयावह चेहरा समोर आणला आहे. 4000 कोटींच्या या रॅकेटने संपूर्ण यंत्रणेला हादरवून सोडले आहे. पुणे पोलिस, एनसीबी आणि सीबीआय यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मोठ्या प्रमाणात मेफेड्रॉन जप्त करण्यात आले; मात्र अजूनही काही मोठे मासे फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज रॅकेट्सचा पर्दाफाश करण्यास मदत करू शकतो.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून मेफेड्रॉन विक्रेता वैभव माने व त्याच्या एका साथीदाराला अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून तब्बल एक कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणाचा सखोल तपास करता विश्रांतवाडी येथील हैदर शेख या ड्रग्ज हँडलरची माहिती पुढे आली. हैदरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडूनही 105 कोटी रुपये किमतीचे 52 किलो 520 ग्रॅम वजनाचे मेफेड्रॉन पोलिसांच्या हाती लागले. पुढे याच लिंकचा मागोवा आधार घेत पोलिसांचे हे पथक कुरकुंभ येथील अर्थकेम लॅबोरेटरीजपर्यंत पोहोचले. या कारखान्यात तर तब्बल 1 हजार 327 कोटी 60 लाखांचे 663 किलो 800 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागले. अर्थकेम लॅबोरेटरीज हाच मेफेड्रॉनच्या तस्करीचा मुख्य अड्डा असल्याची माहिती यावेळी पुढे आली. येथूनच हे ड्रग्ज तस्कर हे अमली पदार्थ दिल्ली तसेच देशातील इतर राज्यांत पाठवित होते. इतकेच नव्हे, तर त्यांनी अनेकवेळा अमली पदार्थ चक्क विमानातून लंडनलाही पाठविल्याची माहिती यावेळी निष्पन्न झाली. या ड्रग्ज तस्करांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच सांगली आणि दिल्ली येथील गोदामातूनही पुणे पोलिसांनी अमली पदार्थाचे मोठे साठे जप्त केले होते. तपासा दरम्यान संदीप धुनिया ऊर्फ धुणेचे नाव पुढे आले होते. धुनिया हाच या ड्रग्ज रॅकेटचा मास्टर माईंड असल्याची माहिती नंतर निष्पन्न झाली आहे.
पुणे ड्रग्ज प्रकरण हा एक गंभीर इशारा आहे. जर वेळेतच योग्य पावले उचलली नाहीत, तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत ड्रग्ज माफियांच्या जाळ्यात अडकू शकतो. पुणे पोलिस, एनसीबी आणि सीबीआय यांनी मोठी कारवाई करून या रॅकेटला तडा दिला; पण अजूनही अनेक आरोपी फरार आहेत. ते देशाच्या अन्य कोणत्याही भागात किंवा महाराष्ट्रातीलच कोणत्या तरी दुर्गम भागात पुन्हा पुन्हा आपला ड्रग्जचा बाजार मांडू शकतात. म्हणूनच समाज, शासन, प्रशासन आणि पोलिस यांनी एकत्र येऊन ड्रग्ज तस्करी आणि ड्रग्जचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे; अन्यथा लवकरच महाराष्ट्रातही ‘उडता पंजाब’चा ट्रेलर गावोगावी बघायला मिळण्याचा धोका आहे.
पुण्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणी वैभव ऊर्फ पिंट्या माने, अजय अमरनाथ करोसिया, हैदर नुर शेख, भिमाजी परशुराम साबळे, युवराज बब्रुवान भुजबळ, आयुब अकबरशहा मकानदार, संदीपकुमार राजपाल बसोया, दिवेष चरणजित भुटानी, संदीप हनुमानसिंग यादव, देवेंद्र रामफुल यादव, सुनीलचंद्र बिरेंद्र बर्मन, मोहम्मद ऊर्फ पप्पु कुतुब कुरेशी, शोयब सईद शेख, सिनथीया ऊर्फ फेवॉर उगबाबं, अंकिता नारायणचंद्र दास, निशांत शशिकांत मोदी अशा 16 जणांवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरारच आहेत.
ड्रग्ज तस्करीची व्याप्ती पुणे, मुंबई, दिल्ली, पश्चिम बंगाल, कर्नाटकासह विदेशात पोहोचली आहे. दिल्ली येथून संदीप यादव याने कुरिअरद्वारे लंडनला तब्बल 218 किलो ड्रग्ज पाठविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्या अनुषंगानेही सीबीआयकडून तपास करण्यात आला आहे. एनसीबीला लंडन येथील ड्रग्स पोहोचविलेल्या ठिकाणाचा पत्ताही सापडला होता. त्यानंतर सीबीआयचीही एन्ट्री या प्रकरणात झाली आहे. या प्रकरणातील महत्वाचे मासे अद्यापही फरार असून, त्याचाही शोध एनसीबीकडून घेतला जात आहे.