Mamta Kulkarni Drug case : ड्रग्ज क्वीन अभिनेत्री ममता कुलकर्णीची माया जगभरात!

ड्रग्ज क्वीन अभिनेत्री ममता कुलकर्णीची माया जगभरात!
Controversial appointment of actress Mamta Kulkarni as Mahamandaleshwar
ड्रग्ज क्वीन अभिनेत्री ममता कुलकर्णीची माया जगभरात!Pudhari File Photo
Published on
Updated on
नरेंद्र राठोड, ठाणे

नव्वदच्या दशकातली बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनण्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद उभा राहिला आहे. आपण बावीस वर्षे तप केलंय अन् त्यानंतर आपणास आत्मसाक्षात्कार झालाय, असा दावा करणार्‍या ममताचे पोलिस दप्तरी मात्र वेगळेच रेकॉर्ड नोंद आहे. ठाणे पोलिसांनी उघड केलेल्या दोन हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्ज प्रकरणात ममता कुलकर्णी मुख्य आरोपी आहे. ‘आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया’ म्हणून ओळख असलेल्या विकी गोस्वामीसोबत लग्न केल्यानंतर याच ममताने आपल्या ड्रग्ज माफिया पतीला कायद्याच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी मुस्लिम धर्म देखील स्वीकारला होता.

ममता कुलकर्णी...! नव्वदच्या दशकातली आघाडीची अभिनेत्री. पण, ती सतत चर्चेत राहिली ते तिच्या अभिनयामुळे नव्हे तर तिच्या वादळी आयुष्यामुळे. ‘इंटरनॅशनल ड्रग्ज माफिया’ विकी गोस्वामी सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर ममताने भारतात चक्क ड्रग्ज फॅक्टरी उभारण्याचा कट आपल्या पतीसोबत मिळून आखला होता. ठाणे पोलिसांनी 2016 साली सोलापूर येथून जप्त केलेल्या दोन हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये समावेश असलेल्या ममता कुलकर्णीची मुंबईतली मालमत्ता देखील ठाणे पोलिसांनी सील केलेली आहे.

मी गेली अनेक वर्षे तपस्या केली आहे, असा दावा करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी याच अनेक वर्षांत पोलिसांपासून बचावासाठी केनियासह इतर देशात लपून बसली होती. ठाणे पोलिसांनी 2016 साली जप्त केलेल्या दोन हजार कोटींच्या एफेड्रीन ड्रग्ज प्रकरणातील मुख्य मास्टरमाइंड विकी गोस्वामी आणि त्याची पत्नी असलेल्या ममता कुलकर्णीच्या विरोधात अंतरराष्ट्रीय स्तरावर रेड कॉर्नर नोटीस देखील अनेक वेळा बजावण्यात आली होती. या ड्रग्ज प्रकरणाच्या पोलिस तपासातून ममता कुलकर्णीविषयी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या.

इंटरनॅशनल ड्रग माफिया असलेला ममताचा पती विकी गोस्वामी यास काही वर्षांपूर्वी दुबई येथे अटक झाल्यानंतर त्यास ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली दुबई न्यायालयाने चौदा वर्षांची शिक्षा सुनावली होती. तेव्हा ममताने मुंबईतील काही नामवंत वकिलांसह दुबईत वकिलांची फौज उभी करून त्यास या केसमधून सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. तेव्हा दुबईतील कायद्यानुसार ममताने विकीसह मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मुस्लिम धर्म स्वीकारताना ममताने आपले नाव आयशा हसन असे ठेवले होते, असा जबाब विकी गोस्वामीच्या बहिणेने ठाणे पोलिसांकडे त्यावेळी दिला होता.

विकी गोस्वामीने भारत, पाकिस्तान, श्रीलंकेसह अनेक देशात ड्रग्ज स्मगलिंगचे जाळे पसरवले होते. गुजरातमधील अहमदाबाद येथे जन्मलेला विकी गोस्वामी 1985 साली मुंबईत आला. मुंबईत छोटे-मोठे व्यवसाय करता-करता तो ड्रग्जच्या व्यवसायात उतरला व त्याने बघताबघता संपूर्ण जगात ड्रग्ज स्मगलिंगचे जाळे उभे केले. 1995 साली विकी भारतातून विदेशात फरार झाला आणि झांबिया या देशात जाऊन स्थायिक झाला. तेथे त्याने एका विदेशी मुलीशी लग्न केले. त्यानंतर तो दाऊद कंपनीच्या संपर्कात आला आणि दाऊदच्या सांगण्यावरून तो आपल्या विदेशी पत्नीला घेऊन दुबईत गेला. 1999 ते 2024 या काळात विकीने डी गँग सोबत मिळून संपूर्ण जगात ड्रग स्मगलिंगचा व्यवसाय पसरवला.

ड्रग्ज स्मगलिंगच्या व्यवसायातून मिळणार्‍या कमाईतून विकीने दुबईत गडगंज संपत्ती जमवली. याच दरम्यान विकीने आपल्या पहिल्या विदेशी पत्नीशी घटस्फोट घेतला. 2014 साली दुबईतील विकीच्या एका हॉटेलच्या ओपनिंगला बॉलीवूडमधील बरेच बडे कलाकार उपस्थित होते. यावेळी विकीची ममता कुलकर्णी सोबत पहिली भेट झाली होती. त्यानंतर ममता दोन वेळा विकीशी भेटण्यास दुबईला गेली आणि तिसर्‍या भेटीत ममताने विकीशी लग्न केले. ममता आणि विकीच्या लग्नाला काही महिने उलटल्यानंतर विकी अमेरिकेच्या सुरक्षा एजन्सीजच्या रडारवर आला. त्याच्यावर अमेरिकेसह दुबईत ड्रग्ज स्मगलिंग कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास दुबईतून अटक करण्यात येऊन त्याच्यावर खटला चालवला गेला. या खटल्यात तो दोषी ठरला आणि अरब सरकारने त्यास चौदा वर्षांची शिक्षा ठोठावली. इतकेच नव्हे तर अरब सरकारने विकीची सर्व मालमत्ता जप्त केली होती. त्यावेळी ममताने स्वतः अन् विकीला मुस्लिम धर्म स्वीकारायला लावून स्थानिक मुस्लिम कायद्यानुसार त्याची या शिक्षेतून सुटका करून घेतली होती. त्यानंतर विकी आणि ममता केनियात स्थायिक झाले.

दुबईच्या खटल्यामध्ये पूर्णपणे बर्बाद झालेल्या विकीने ममताच्या सोबतीने केनियातून पुन्हा ड्रग्ज स्मगलिंगचा व्यवसाय सुरू केला. जगभरातील ड्रग्ज माफियांशी असलेल्या संबंधामुळे त्याने अल्प कालावधीतच आपले साम्राज्य पुन्हा उभे केले. भारतातल्या काही ड्रग्ज माफियांसोबत मिळून विकीने इंटरनशनल ड्रग्ज मार्केटचे बादशाह म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘बकतस आकाशा ब्रदर्स ग्रुप’ सोबत हातमिळवणी केली होती. इंटरनॅशनल ड्रग माफिया आकाशा ब्रदर्ससह अमली पदार्थ उत्पादनाचा कुख्यात निर्माता डॉ. अब्दुल्ला याच्यासोबत विकीची केनियात महत्त्वपूर्ण मिटिंग झाली होती. 4 जानेवारी 2016 रोजी केनियात पार पडलेल्या या मिटिंगमध्ये आकाशा ब्रदर्स, डॉक्टर अब्दुला, विकी गोस्वामी, किशोरसिंग राठोड, जय मुखी आणि ममता कुलकर्णी आदी उपस्थित होते.

या मिटिंगमध्ये ममता कुलकर्णीला ‘एव्हान लाईफ सायन्स’ कंपनीचे संचालक बनवायचे, असा ठरवा पास झाला. या बैठकीस पाकिस्तानमधील ड्रग्ज माफिया गुलाम हुसेन, सोलापूरच्या एव्हान लाईफ सायन्स कंपनीचा संचालक मनोज जैन हे देखील उपस्थित होते. या मिटिंगमध्ये ड्रग्ज बनवण्यासाठी महत्त्वाचा घटक असलेल्या एफेड्रीन या रॉ मटेरियलची सोलापूर येथील एव्हान लाईफ सायन्स कंपनीत उत्पादन करण्याचा निर्णय घेतला होता.

सोलापूर येथील हे एफेड्रीन भारताबाहेर तस्करी करून इस्ट आफ्रिकन कंपनीच्या केनिया आणि तंजानिया या देशात त्यावर प्रक्रिया करून ड्रग्जचे उत्पादन करण्यात येणार होते; मात्र त्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी सोलापूरच्या एव्हान लाईफ सायन्स कंपनीवर छापा मारून सुमारे दोन हजार कोटीच्या घरात किंमत असलेले 18 टन एफेड्रीन जप्त केले होते. त्यानंतर या इंटरनॅशनल ड्रग्ज माफिया मंडळींवर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात ममता कुलकर्णी आरोपी क्रमांक चौदा होती. या गुन्ह्यात आरोपी असलेल्या ममताची मुंबईतील मालमत्ता देखील पोलिसांनी सील केलेली आहे.

ममताची तपश्चर्या, आराधना आणि माया!

अशी ही ममता कुलकर्णी अलीकडे स्वत:ला महान तपस्वी समजू लागली आहे. केवळ भगवी कपडे परिधान करून आणि स्वत:च्या फिल्मी ग्लॅमरचा वापर करून तिने किन्नर आखाड्याचीदेखील फसवणूक करून स्वत:ला महामंडलेश्वर म्हणून घोषित करून घेतले, पण लवकरच या पदावरून तिची हकालपट्टीही झाली. ममता आपण कित्येक वर्षांची तपश्चर्या केल्याचा दावा करीत असली तरी तिने आपला पती विकी गोस्वामी याच्याबरोबर जगभरात कुठे कुठे आणि कसली तपश्चर्या केली आहे, कुणा कुणाची ‘आराधना’ केली आहे आणि आपल्या ममतामय कामगिरीने किती ‘माया’ गोळा केली आहे, याचा सगळा कच्चाचिठ्ठा पोलिस दप्तरी नोंद आहे.

Controversial appointment of actress Mamta Kulkarni as Mahamandaleshwar
अभिनेत्री ममता कुलकर्णीला मोठा दिलासा; ड्रग्ज प्रकरणी न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news