सध्या सुरू असलेल्या विठुरायाच्या वारीस्थळी व राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आकाशातून विहंगम द़ृश्य टिपण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्र म्हणजे ड्रोन, इतकीच माहिती खूप सार्या सर्वसामान्य नागरिकांना असेल; पण हेच विहंगम द़ृश्य टिपणारे ड्रोन सध्या अर्ध्याहून अधिक जगात विध्वंस माजवत आहेत. भारत-पाकिस्तान आणि इस्रायल-इराण युद्धात सगळ्यात जास्त प्रभावी, अत्याधुनिक, अत्यंत घातक आणि मानवरहित शस्त्र म्हणून ड्रोनचा वापर केला गेला. या युद्धात समोर आलेले ड्रोनचे अत्यंत विध्वंसक रूप बघून आर्म स्मगलर सिंडिकेटदेखील थक्क झाले आहे.
अलीकडे शेतीच्या कामांसाठीदेखील ड्रोनचा वापर होऊ लागल्याने ड्रोनची ओळख एका कॅमेर्याच्या पलीकडे होऊ लागली आहे. मात्र, हेच ड्रोन अत्यंत विध्वंसक शस्त्रदेखील आहे, हे सार्या जगाला दिसून आले ते इस्रायल-इराण आणि भारत-पाकिस्तान युद्धप्रसंगी. भारताने पाकिस्तानमधील एअरबेसवर हल्ला करण्यासाठी अत्यंत अत्याधुनिक ड्रोनचा वापर केला होता. या ड्रोनची क्षमता इतकी घातक व अत्याधुनिक होती की, त्यास रोखणे तर दूर; पण स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी पाकिस्तान सैन्याला ऐनवेळी पळापळ करावी लागली. इस्रायलनेदेखील आपल्या अत्याधुनिक व शक्तिशाली ड्रोन शस्त्राचा वापर करीत थेट इराणमध्ये घुसून तेथील सैन्यप्रमुखासह अनेक बड्या अधिकार्यांना ठार केले आहे.
देशा-देशांतील भांडणात ड्रोनसारख्या शस्त्राचा उपयोग यापूर्वी सरळसरळ झाला नसला, तरी मानवरहित विमानांचा उपयोग युद्धात अमेरिकेसारखा देश 1950 पासून करतोय, अशी नोंद इतिहासात आढळून येते; तर भारतात मानवरहित ड्रोनचा वापर 1980 पासून होतोय, अशी नोंद ‘नासकॉम कम्युनिटी’ या संस्थेच्या अहवालात आढळून येते. भारतीय वायुसेनेच्या सुरक्षेसाठी सर्वप्रथम ड्रोनचा वापर करण्यात आला होता. भारताचा पहिला स्वदेशी विकसित ड्रोन ‘निशांत’ होता. ज्याचे रक्षा अनुसंधान आणि विकास संघटन म्हणजेच डीआरडीओने 1995 साली यशस्वी परीक्षण केले होते. त्यानंतर हळूहळू ड्रोनचा उपयोग भारतात सीमावर्ती भागात आकाशमार्गे गस्त घालण्यासाठी, तसेच शोध व बचाव कार्यासाठी होऊ लागला. 1990 च्या काळानंतर ड्रोनच्या तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली अन् अनेक देश ड्रोनसारख्या यंत्राचा वापर हेरगिरीसाठी व घातक शस्त्र म्हणून करू लागले. मानवरहित विमानामुळे मनुष्यहानी न झेलता सरळसरळ विरोधकांवर हवाई हल्ला करता येऊ शकतो ही बाब ओळखून अलीकडे सार्याच देशांनी हलके, सुक्ष्म, अत्याधुनिक अन् अत्यंत घातक स्फोटाने भरलेले आकाशात उडणारे यंत्र बनवण्यावर भर दिला आहे. याच यंत्रास ड्रोन असे म्हणतात.
आगामी युग हे ड्रोन युद्धाचे आहे, हे ओळखून सगळ्याच देशांनी अत्याधुनिक व घातक ड्रोन विकसित करण्यावर फार पूर्वीपासूनच भर दिला आहे. सध्याच्या स्थितीत सगळ्याच देशांकडे एकापेक्षा एक वरचढ घातक ड्रोन आहेत. ड्रोनचे अत्याधुनिक शस्त्र बनवण्यात अमेरिका आघाडीवर असला, तरी रशिया, इस्रायल, टर्की, चीन, जपान, ब्रिटन, भारत असे देशदेखील ड्रोनसारखे हत्यार मोठ्या प्रमाणात विकसित व निर्मित करीत आहेत. चीनने तर अतिशय सुक्ष्म असा मोस्कीटो ड्रोन तयार केला आहे. जो एका माशीसारखे दिसतो व ते कोणत्याही ठिकाणी जाऊन हेरगिरी अथवा हल्ला करू शकते. बचाव कार्यासाठी आम्ही या ड्रोनचा उपयोग करणार आहोत, असे चीन सध्या सांगत असला तरी अशा ड्रोनचा उपयोग खासकरून सैन्य कारवाईत केला जातो, असे जाणकार सांगतात.
भारताकडेदेखील हार्पी, हारोप, सर्चर, हेरॉन, नागस्त्र-1, रुस्तम-2, आर्चर-एनजीसारखे अत्याधुनिक ड्रोन आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत केलेल्या कारवाईत ड्रोन हल्ले सगळ्यात प्रभावी ठरले आहेत. भारताने स्वतः तयार केलेल्या स्काईस्ट्राईकर, नागस्त्र-1, रुस्तम-2, आर्चर-एनजी अशा स्वदेशी ड्रोनला रोखणे तर दूर; पण स्वतःचे लोकेशन लपवण्यासाठी पाकिस्तानला पळापळ करावी लागली. या ड्रोनला रडारदेखील पकडू शकत नाही. स्काईस्ट्राईकरसारखे ड्रोन गुप्त आणि अचूक लक्ष साधण्यात पूर्णपणे सक्षम आहेत. सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी खासकरून हे स्वदेशी ड्रोन विकसित करण्यात आले आहेत.
ड्रोनसारख्या यंत्राचा उपयोग घातक शस्त्र म्हणून केला जाऊ शकतो हे जगासमोर आता आले असले, तरी ड्रोन भविष्यातील सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे, हे ओळखून अनेक देशांनी या शस्त्रांची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली आहे. भविष्यात ड्रोनसारखे शस्त्र अधिक सुक्ष्म, घातक व विध्वंसक बनवण्यासाठी अधिक प्रयत्न होतील हे साहजिकच आहे. कोणत्याही देशाची सीमा, बंधने, नियम, कायदा सर्व डावलून हे ड्रोन कुठेही घुसखोरी करू शकतील. त्यामुळे कोणत्याही देशात घुसून विरोधकांना ठार करण्यासाठी या ड्रोनसारख्या हत्याराचा वापर केला जाऊ शकतो. सध्या इस्रायल ड्रोनच्या मदतीने इराणमधील अनेक बड्या सैन्य व गुप्तचर अधिकार्यांना टार्गेट करून थेट इराणमध्ये घुसून ठार करीत आहे; तर अमेरिकेने ड्रोनच्या मदतीने असंख्य दहशतवादी वेगवेगळ्या देशांत हेरून ठार केले आहेत. विध्वंसक ड्रोनचा वापर आजस्थितीत युद्धात होत असला, तरी या ड्रोन हल्ल्यात आतापर्यंत हजारो निष्पाप नागरिकांनादेखील आपला जीव गमवावा लागला आहे, असे निरीक्षण जागतिक पातळीवर युद्ध परिणामांचे सर्वेक्षण करणार्या ‘एअरवार्स’ या संस्थेने आपल्या अहवालात नोंदवले आहे.
ड्रोनचा वापर दहशतवादी व गुन्हेगारी संघटनांकडूनदेखील होऊ शकतो, अशीदेखील शक्यता जाणकार वर्तवतात. युद्धात वापर होणार्या बहुतांश शस्त्र व साधनसामग्रीची नकल जागतिक पातळीवरील गुन्हेगारी संघटना करतात, असा इतिहास आहे. कधी काळी डार्कवेबसारखा इंटरनेटच्या गुप्त जगाचा वापर अमेरिकेतल्या गुप्तचर यंत्रणा आपली सिक्रेट माहिती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी करीत असत. परंतु, याच डार्कवेबची कल्पना नंतर गुन्हेगारी जगताने उचलून धरली अन् आज डार्कवेब तस्करी व अवैद्य धंद्याचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे. सध्या युद्धात समोर आलेले ड्रोनचे अत्यंत विध्वंसक रूप बघून आर्म स्मगलर सिंडिकेटदेखील थक्क झाले आहे. भविष्यात हेच आर्म सिंडिकेट ड्रोनसारख्या शस्त्रांची निर्मिती करू लागले तर गुन्हेगारी जगाचे स्वरूप अत्यंत विनाशकारी ठरेल, अशी भीती जाणकार व्यक्त करतात.