

धुळे : मानसिक छळ करून एकाच कुटुंबातील चौघांना जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांनी तिघा आरोपींना १० वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या आरोपींपैकी एकजण तत्कालीन पोलीस पाटील आहे.
ही घटना १७ फेब्रुवारी २०१७ रोजी नरडाणा पोलीस ठाणे हद्दीत घडली होती. आसाराम भबुता भिल, मोठाभाऊ उर्फ विनोद भिल आणि शिवदास भिल या तिघांनी भुसावळ-सुरत रेल्वेमार्गावर धावत्या गाडीखाली उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच दिवशी विठाबाई भिल व मुलगी वैशाली भिल यांनी विहिरीत उडी घेतली. यात विठाबाई यांचा मृत्यू झाला, तर वैशाली भिल सुदैवाने बचावली.
आसाराम भिल यांनी जीवनयात्रा संपविण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींनी त्यांच्या कुटुंबाला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिल्याची माहिती दिली होती. भिला चंद्रा भिल, चंदर झिपा भिल आणि पोलीस पाटील प्रविण ओंकार पाटील यांनी कुटुंबाला खोट्या आरोपांत गोवून, रात्रीच्या वेळी गाव सोडण्याची धमकी दिली. “गाव सोड किंवा फाट्यावर जाऊन जीव दे,” अशी धमकी देण्यात आली होती. तसेच, परत गावात आल्यास ठार मारण्याची धमकीही दिली होती.
या प्रकरणी वैशाली भिल यांच्या तक्रारीवरून नरडाणा पोलीस ठाण्यात कलम ३०६, ३२३, ५०६(२) सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी केला. त्यांनी घटनास्थळ पंचनामा, वैद्यकीय अहवाल, मृतदेहांचे शवविच्छेदन आणि साक्षी नोंदवून घटनेचा सखोल तपास केला.
या खटल्याची सुनावणी धुळे जिल्हा न्यायालयात सुनावण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील निलेश भगवान कलाल यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली. यामध्ये फिर्यादी, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणकुमार नागे, तपासी अधिकारी मथुरे व पोलीस उपनिरीक्षक वर्षा पाटील यांचा समावेश होता.
साक्ष व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने भिला चंद्रा भिल, चंदर झिपा भिल आणि पोलीस पाटील प्रविण पाटील यांना दोषी ठरवत प्रत्येकाला १० वर्ष सश्रम कारावास व ५,००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाचे अतिरिक्त वकील निलेश कलाल यांना जिल्हा सरकारी वकील देवेंद्रसिंह तवर यांचे मार्गदर्शन या प्रकरणी लाभले.