

नाशिक : माहिती अधिकार कार्यकर्त्यावर गोळीबार केल्याप्रकरणी न्यायालयाने सशर्त जामीन दिलेल्या दीपक सुधाकर बडगुजर पोलिसांसमोर हजर हाेत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी दीपकचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजुर करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात मोक्का कायद्यानुसार अटक केलेल्या सहा संशयितांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
सिडकोतील प्रशांत जाधव यांच्यावर १४ फेब्रुवारी २०२२ रोजी उपेंद्रनगर येथे गोळीबार करण्यात आला. या गोळीबार प्रकरणात दोन वर्षांनी संशयितांचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी तपास करीत आकाश आनंदा सूर्यतळ (२४, रा. नाशिकरोड), श्रीकांत वाकोडे उर्फ बारक्या, सनी पगारे उर्फ टाक्या (दोघे रा. जेतवननगर, उपनगर), लक्ष्मण शेवाळे (३३, रा. सिडको), प्रसाद संजय शिंदे (२९, रा. नांदूरगाव), मयूर बेद यांची धरपकड केली. सखोल तपासात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक याचाही सहभाग उघड झाला. त्यामुळे दीपक फरार होता. दरम्यान, न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यास सशर्त जामीन दिला. त्यात महिन्याच्या १६ व २९ तारखेला गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संदिप मिटके यांच्यासमोर हजेरी लावण्याचे आदेश होते.
मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक याने पोलिसांसमोर हजर न राहता पसार झाल्याचे समजते. त्यामुळे पोलिसांनी न्यायालयात दीपकच्या जामीन अर्जाविरोधात अर्ज केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याने दीपकचा जामीन अर्ज नामंजूर करावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयितांविरोधात मोक्कानुसार कारवाई केली असून पोलिसांनी इतर सहा संशयितांना अटक केली हाेती. त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२) पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा जणांना त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.