Deepak Badgujar | दीपक बडगुजरला अटकेपासून दिलासा; जामीन मंजूर
नाशिक : माहिती अधिकार कार्यकर्ता प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या दीपक सुधाकर बडगुजर याचा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे.
जाधव यांच्यावर गोळीबार करून संशयितांनी प्राणघातक हल्ला केला होता. अंबड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार शहर पोलिसांनी तपास करीत सुमारे अडीच वर्षांनंतर एकापाठोपाठ एक अशी सात संशयितांची ओळख पटवून धरपकड केली. मात्र संशयित दीपक बडगुजर गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. अटक टाळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यावर गुरुवारी (दि. १०) दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. तर शुक्रवारी (दि. ११) न्यायालयाने निर्णय देत दीपकला सशर्त अटकपूर्व जामीन दिला. त्यामुळे त्याची अटक टळली आहे. त्यास न्यायालयाने दर महिन्याच्या १६ आणि २९ तारखेस अंबड पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासह अन्य अटी, शर्थी दिल्या आहेत.
मोक्काची टांगती तलवार
अटकेपासून कायदेशीर संरक्षण मिळाले असले तरी शहर पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्कानुसार कारवाई प्रस्तावित केली आहे. संशयितांनी संघटितपणे हा गुन्हा केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे मोक्काचा प्रस्ताव तयार केला असून, त्यावर सोमवारी (दि. १४) निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी सांगितली.
'सत्य परेशान होता है पराजित नही' हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ राजकीय हेतूने आम्हाला त्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. यामुळे या प्रकरणात न्याय मिळेल, अशी खात्री आहे.
सुधाकर बडगुजर, जिल्हाप्रमुख, शिवसेना, ठाकरे गट, नाशिक.

