

ठळक मुद्दे
प्रेयसीने कर्जबाजारी प्रियकरासाठी घरातूनच आईचे दागिने चोरले
तरुणीने आईचे 11 तोळे दागिने आणि एक लाख 55 हजारची रोकडही प्रियकाला दिली.
आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या आईचे दागिने दिले कर्जबाजारी प्रियकराला
छत्रपती संभाजीनगर : कर्जबाजारी प्रियकराने प्रेयसीला तिच्याच आईचे दागिने काढून देण्यासाठी गळ घातली. त्या मुलीने देखील घरातील सुमारे ११ तोळ्यांचे दागिने आणि १ लाख ५५ हजारांची रोकड प्रियकराला काढून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि.९) भारतनगर, एन १३, हडको भागात घडली. मंगेश विलास पंडित (१९, रा. बेगमपुरा) आणि १९ वर्षीय तरुणी अशी मुख्य आरोपींची नावे आहेत. तर मंगेशसह त्याचा मित्र कुणाल माणिक केरकर (१९, रा. बेगमपुरा) यास बेगमपुरा पोलिसांनी अटक केली असून दोघांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
फिर्यादी ५८ वर्षीय महिला या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी (साक्षी नाव बदलेले) अशी अपत्य आहेत. शनिवारी (दि.९) सकाळी रक्षाबंधन असल्याने त्यांच्या मुलाने आईकडे वापरण्यासाठी सोन्याची अंगठी मागितली. तेव्हा महिलेने कपाटात पाहिले तेव्हा दागिन्यांचे सर्व डब्या रिकाम्या दिसल्या. तसेच १ लाख ५५ हजारांची रोकड देखील गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी मुलगी साक्षीकडे विचारपूस केली तेव्हा तिने सर्व दागिने ज्यामध्ये प्रत्येकी २४ आणि २१ ग्रामच्या २ चेन, ३ ग्रामची कानातील रिंग, १० ग्रॅमचे सोन्याचे नाणे, प्रत्येकी १० ग्रामच्या ३ अंगठ्या, ४ ग्रामचे सोन्याचे पदक, अडीच ग्रामची रिंग, २ ग्रामची अंगठी, सोन्याच्या ३ ग्रॅमच्या बाळ्या, अडीच तोळ्यांचे मंगळसूत्र, १० ग्रामचे कानातले जोड, चांदीची अंगठी आणि १ लाख ५५ हजार रुपये दोन महिन्यांपूर्वीच रुमालात गुंडाळून दिल्याचे सांगितले. हे ऐकून महिलेला मोठा धक्का बसला. तिने सोमवारी (दि.११) बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरून मुलीसह पंडित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर पंडितने साक्षीकडे पैशाची गरज असल्याचे सांगून तिच्याकडे पैशाची मागणी केली होती. प्रेमात वेडी झालेल्या साक्षी या मुलीने स्वतःच्या आईचे दागिने रुमालात गुंडाळले. एका रात्री तिने दोरी बांधून बकेटमध्ये दागिने टाकून खाली सोडले. ते दागिने पंडितने त्याचा मित्र कुणालच्या मदतीने घेतले होते. त्याने दागिन्यांचे काय केले हे अजूनही समोर आलेले नाही. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत.