

चाकूर (लातूर) : तालुक्यातील शेळगाव येथील तिरू नदीत एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचे प्रेत सापडल्याची घटना रविवारी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली असून पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देवून अज्ञाताविरुद्ध सोमवारी वाढवणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार पथके तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चाकूर ते शेळगाव फाट्याजवळील तिरू नदीत रस्त्यावरील पुलावरून एका अज्ञात आरोपीने अज्ञात अनोळखी स्त्री जातीचे वय अंदाजे 15 वर्षे ते 25 वर्षे वयाच्या स्त्रीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून भरून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तिरू नदीवरील पुलावरून खाली पाण्यात फेकून दिला आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास या भागातील शेतकर्यांना उग्रवास आल्यामुळे ही घटना निदर्शनास आली. याची माहिती शेतकर्यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान वाढवणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, चाकूरचे पोलिस निरीक्षक बालाजी भंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील महिलेचा खून केल्याचा संशय व्यक्त होत असून ही महिला नेमकी कुठली आहे याविषयी अद्याप माहिती मिळू शकली नसून पुढील शोध पोलिस घेत आहेत.अतिरिक्त पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर आदी पोलिस अधिकार्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांचे चार पथक विविध मार्गांनी शोध घेत असून त्या महिलेच्या मृतदेहावर चापोली येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्या मृतदेहावर चाकूर येथील सार्वजनिक स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला. पोलिस पाटील गुणवंतराव बाबाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध वाढवणा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील अधिक तपास पोलिस करीत आहे.