सटाणा (नाशिक) : मालेगावपाठोपाठ 'चड्डी बनियान' गँग आता सटाणा शहरात सक्रिय झाली आहे. रविवारी (दि.21) रात्री दीड वाजता श्रीकृष्ण नगरमध्ये घरफोडी करुन दुसऱ्या घराकडे मोर्चा वळविलेल्या टोळीचा जागरुक नागरिकांच्या सतर्कमुळे प्रयत्न फसला. मात्र वस्तीवरील पोलिस पथकाला गुंगारा देण्यात चोरटे यशस्वी झालेत.
काही दिवसांपूर्वी मालेगावमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या'चड्डी बनियान गँग'ने आता सटाणा शहराकडे मोर्चा वळवला आहे. काल मध्यरात्री (दि. २२) दीड वाजेच्या सुमारास नामपूर रोड परिसरातील श्रीकृष्ण नगरच्या मळे परिसराला लागून असलेल्या सोनवणे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. सोनवणे कुटुंबीय बाहेर गावी गेले असल्याची संधी चोरट्यांनी साधली. कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त करत कपडे आदी साहित्य घेऊन चोरटे दुसऱ्या घराकडे गेले. काही महिन्यांपूर्वी याच घरात पहाटे चोरी झाली होती.
या दरम्यान, स्थानिकांना संशयास्पद व्यक्ती दिसल्याने तत्काळ पोलिसांना खबर देण्यात आली. अवघ्या पाच मिनिटांत वस्तीवरील दोन पोलिस दुचाकीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांची आणि चोरट्यांची नजरानजर झाली अन् चोरट्यांनी तार कंपाऊंड ओलांडून शेतशिवारात धूम ठोकली. पोलिस आणि स्थानिकांनी पाठलाग केला मात्र अंधार व मका शेताचा फायदा घेत चोरटे पसार झालेत. एव्हाना शिवारातील शेतकरी जागे होऊन वाटा रोखण्यात आल्या. परंतु, वाढलेली पिकं आणि झाडाझुडुपांत चोरटे दबून निसटलेत.
दरम्यान, यातील घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. साधारण पाच ते सहा चोरटे असून त्यांनी केवळ चड्डी घातलेली असून डोक्याला रुमाल बांधलेला दिसत आहे. हातात कटरसदृश वस्तू होती. पोलिस मागावर असताना एकाने चप्पला व रुमाल फेकून पोबारा केल्याचे निदर्शनास आले. दुसऱ्या दिवशीपर्यंत हे पुरावे पोलिसांनी ताब्यात घेतले नाहीत अथवा पंचनामा देखील केलेला नव्हता.
या गँगने विविध ठिकाणी दहशत माजवली असून आता ते बागलाण तालुक्यात सक्रिय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चोरीच्या पद्धतीवरून ते परराज्यातील असल्याचा संशय व्यक्त केला जातो. काही प्रकरणांत अहिल्यानगर जिल्ह्यातील आरोपी सापडले असल्याने हीच टोळी असावी का, अशी चर्चा आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, तसेच मळे शिवारात गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.