

मुंबई : आर्थिक बाजारातील गैरव्यवहारांवर मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ॲक्सिस म्युच्युअल फंडाचे माजी चीफ डीलर वीरेश गंगाराम जोशी याला अटक केली आहे. २०१८ ते २०२१ दरम्यान झालेल्या सुमारे २०० कोटी रुपयांच्या 'फ्रंट रनिंग' घोटाळाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, या अटकेमुळे गुंतवणूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या कारवाईदरम्यान 'ईडी'ने शेअर्स, म्युच्युअल फंड आणि बँक बॅलेन्सच्या स्वरूपातील १७.४ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. जोशी या घोटाळ्यात एकटा नसून, इतर अनेक व्यापारी आणि दलालही 'ईडी'च्या 'रडार 'वर आहेत. जोशी याला २ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ८ ऑगस्टपर्यंत 'ईडी' कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे बाजाराच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
'ईडी'ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमएलपीए) ही कारवाई केली आहे. १ आणि २ ऑगस्ट रोजी दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या अनेक शहरांमध्ये छापे टाकण्यात आले. 'ईडी'च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता व्यवस्थापनाखाली असणाऱ्या अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे.
डिसेंबर २०२४ मध्ये मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे 'ईडी'ने तपास सुरू केला. जोशी याने अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या मोठ्या व्यवहारांची गोपनीय माहिती मिळवून, त्याआधारे बनावट खात्यांद्वारे स्वतःचे व्यवहार आधीच पूर्ण करून अवैध नफा कमावल्याचा आरोप आहे.
तपासात असे समोर आले आहे की, जोशी याने या फ्रंट रनिंग व्यवहारांसाठी दबईतील एका टर्मिनलचा वापर केला होता. या घोटाळ्यातून मिळालेला अवैध पैसा, जो आता 'गुन्ह्याची मालमत्ता' म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे, तो जोशी, त्याचे सहकारी आणि कुटुंबीयांच्या नियंत्रणाखाली असलेल्या शेल कंपन्या आणि बँक खात्यांच्या नेटवर्कद्वारे फिरवण्यात आला. 'ईडी'च्या प्राथमिक अंदाजानुसार, घोटाळ्याची रक्कम २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, तपासात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.