

डेंग्यूचे रुग्ण झाले दुप्पट
हिपॅटायटीस रुग्णसंख्या पाचपटीने वाढली
जून महिन्यापेक्षा रुग्णसंख्या वाढली
मुंबई : मुंबईमध्ये पावसाची उघडीप असली तरी साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जूनमध्ये मलेरिया व गॅस्ट्रोची रुग्णसंख्या वाढलेली होती. पण गेल्या महिन्याच्या तुलनेत जुलैमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, हिपॅटायटीसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जुलैच्या दुसर्या पंधरवड्यात डेंग्यूचे 426, मलेरियाचे 651, चिकनगुनियाचे 86 रुग्ण, गॅस्ट्रोचे 351 रुग्ण आढळून आले आहेत. तर हिपॅटायटीस रुग्णसंख्या पाचपटीने वाढली आहे.
जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागते. मात्र यंदा मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने साथीच्या आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाले. त्यामुळे हिवताप, डेंग्यू, अतिसार आणि चिकुनगुनियाच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्येही वाढ झाली होती, मात्र आता रुग्ण कमी झाले आहेत. मुंबईमध्ये जुलैच्या 15 दिवसांमध्ये 633 रुग्ण सापडले होते, तर या पंधरवड्यात 651 रुग्ण सापडले आहेत. या पंधरवड्यात डेंग्यूची रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.
जुलैच्या सुरुवातीस 282 रुग्ण आढळले होते, आता 426 रुग्ण आढळलेत. चिकुनगुनियाचे जुलै सुरुवातीस 43 रुग्ण म्हणजेच दुपटीने वाढ झाली आहे. गॅस्ट्रोचे जुलैमध्ये आतापर्यंत 351 रुग्ण सापडले आहेत, हिपॅटायटीस रुग्णांमध्ये पाचपटीने वाढ झाली आहे . जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात 40 रुग्ण सापडले होते, आता या पंधरवड्यात 216 रुग्ण आढळून आलेत.
नागरिकांनी ताप आल्यास घराजवळील महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र, दवाखाना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि रुग्णालयामध्ये जाऊन त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, स्वत: औषधे घेणे टाळा.
डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका