[author title="मारुती वि. पाटील, कोल्हापूर" image="http://"][/author]
मूळचा झारखंडचा असलेला, श्रीमंत मध्यमवर्गीय कुटुंबात शैक्षणिक वातावरणात किशोर वाढलेला होता. आग—ा जवळच्या किरवली या शहरवजा गावात किशोर पुढच्या पात्रता परीक्षेच्या तयारीसाठी एक रूम घेऊन अभ्यासासाठी एकटाच राहात होता. या नुकत्याच अठराव्या वर्षात पदार्पण केलेल्या या किशोरची सहा महिन्यांपूर्वीच फेसबुकवर किरण नावाच्या एका मुलीशी मैत्री झाली होती. तिने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर तिचे वय 18 लिहिले होते. प्रोफाईल फोटोवर एका सुंदर 18 वर्षीय मुलीचा फोटो होता. किशोर बघताक्षणीच त्या फोटोच्या प्रेमात पडला. त्याने ती प्रोफाईल चेक केली. किरण शर्मा, वय 18, सीटी ब्लॉक, पॅराडाइज अपार्टमेंट, आग्रा, उ. प्रदेश.
किशोरने घाबरतच फ्रेंड रिक्वडस्ट टाकली. त्याला त्या दिवशी कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. जेईई क्रॅक करायची होती त्याला. त्यामुळे बारावीला चांगले मार्कस् असूनही एका वर्षाचा गॅप घेऊन तो जोमाने अभ्यास करत होता, पण अभ्यासाचा कंटाळा आला की ब्रेक म्हणून तास-दोनतास फेसबुक अकाऊंट उघडून बसायचा. असाच एकदा अकाऊंट उघडून बसल्यावर त्याची नजर किरणच्या फेसबुक अकाऊंटवर पडली होती.
दोन दिवसांनी त्याने त्याचे अकाऊंट ओपन करून चेक केले तर त्याला दिसले की त्याची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली आहे. किशोरने आपले नाव सांगितले. तिनेही आपले नाव सांगितले. आपण कोण, काय करतो हेही सांगितले. तिनेही आपण सध्या बारावीचे शिक्षण घेत असून आपल्यालाही जेईईतून पुढे करिअर करायचे वगैरे गप्पा सुरू केल्या. आता दोघांच्या दररोज ऑनलाईन गप्पा सुरू झाल्या होत्या. काही दिवसांनंतर दोघांनी एकमेकांना आपले मोबाईल नंबर दिले. त्यानंतर दोघांनी कॉल करणे आणि एकमेकांशी फोन वर बोलणेही सुरू केले. किरण कधीही व्हिडीओ कॉल घ्यायची नाही. तसे तिने किशोरकडून प्रॉमिस घेतलं होतं.
हळूहळू दोघेही आता प्रेमाबद्दल बोलू लागले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. तो तिला मागेल त्या गिफ्टस् पाठवू लागला. किशोर आता अभ्यासाकडे दुर्लक्ष करू लागला. त्याने किरणला लग्नाचे वचनही देऊन टाकले. किशोरला आता किरणला भेटायचे होते. ही ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. त्याने डेटिंगचा प्लॅन केला. किशोरने किरणला दिल्ली मेट्रोस्टेशनवर बोलावले. दोघेही आता पहिल्यांदाच एकमेकांना समोरासमोर भेटणार होते.
किशोर दिल्ली मेट्रोस्टेशनवर पोहोचला. त्याच्या मनात प्रचंड धाकधूक होती. त्याने तिच्या नंबरवर कॉल केला. तेव्हा, 'आलेच मी' म्हणून एकदोन मिनिटांत एक पस्तीस ते चाळिशीच्या दरम्यान वय असलेली, तोंडाला स्कार्फ बांधलेली स्त्री किशोरच्या जवळ आली.'हाय बेबी' म्हणत तिने आपल्या चेहर्यावरचा स्कार्फ बाजूला केला. किशोरला काही समजेना. तो भांबावला. पण काही वेळात स्वत:ला सावरत, 'एस्क्यूज मी… कोण आपण?' म्हणून त्याने त्या स्त्रीला प्रश्न केला. 'बेबी, असं काय करतोस, मी किरण. आपण भेटायचं ठरलं नव्हतं का? तू असं काय परक्यासारखा वागतो आहेस?' तिने आपली खरी हकीकत सांगायला सुरुवात केली. दोघेही शेजारच्या एका बाकावर बसले होते. किशोरचा हात हातात घेऊन आपली स्टोरी सांगत होती.
आता किशोरला वेड लागायचं बाकी होतं. वास्तव आणि अनुभव यात त्याला काय करावे ते सुचेना. 'मी प्रेम केलेली किरण अशी नाही, ही बाईतर प्रौढ आहे. हिचे लग्न झालेय, हिला दोन मुली आहेत. नवर्याने घटस्फोट घेतलाय. हिला माझ्याशी लग्न करायचे आहे. कसे शक्य आहे?' कसातरी स्वत:ला सावरत किशोर आपली तब्येत बिघडण्याचे कारण सांगून तेथून आपल्या रूमवर आला. 'म्हणजे ही किरण फसवी आहे. तिचे फोटो खोटे आहेत. वय, तिने दिलेली माहिती सगळे खोटे आहे.' असा विचार करत तो पूर्णपणे मनातून कोसळला. दरम्यान, किरणने 'माझ्याशी मैत्री तोडलीस तर मी तुझ्या घरी सगळे सांगीन, तुझ्या आईवडिलांना आपल्या अफेअरची माहिती देणार. तुझे गिफ्ट मी पुरावा म्हणून घरच्यांना दाखवणार', म्हणून ब्लॅकमेल करू लागली. त्यामुळे तो आणखीच घाबरला.
तो खूप अस्वस्थ झाला होता. आत्महत्या करण्यासाठी घरातून बाहेर पडला आणि शेवटी त्याने शेवटचे बोलावे म्हणून आपल्या आईवडिलांना फोन लावला. आईचा फोन बिझी होता. त्याने बाबांना फोन केला आणि आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले. वडिलांनी प्रसंगावधान राखून त्याचा ठावठिकाणा विचारला. त्याला आहे तिथेच थांबायला सांगून लागलीच चाईल्ड हेल्पलाईनच्या क्रमांकावर फोन केला आणि आपला मुलगा आत्महत्येसाठी रेल्वे रुळावर गेल्याचे सांगितले. चाइल्ड हेल्पलाइन टीमचे सदस्य त्या ठिकाणी त्वरित पोहोचले आणि किशोरला आपल्या ताब्यात घेतले. किरणला ताब्यात घेऊन तिचेही कौटुंबिक समुपदेशन केंद्रात समुपदेशन करत तिच्यावर उपचार करण्यात आले. पोलिस, प्रशासन आणि समाजसेवी संस्था यांच्या सहकार्याने एका युवकाचा नाहक जाणारा जीव वाचला. हाच किशोर आज एका परदेशी कंपनीत मोठ्या पगाराच्या हुद्यावर यशस्वीपणे नोकरी करत आपले चौकोनी कुटुंब सांभाळत आनंदी जीवन जगत आहे.