

प्रमोद अडसुळे, छ. संभाजीनगर
थंडीने गारठलेली 13 जानेवारीची ती सकाळ... जामडी फॉरेस्टचा निर्जन परिसर नेहमीप्रमाणे शांत होता. पण, या शांततेच्या पोटात एक भीषण रहस्य दडलं होतं. एका नाल्यात, झाडाच्या मुळाशी एक मृतदेह अर्धवट लपवलेल्या अवस्थेत पडला होता. डोक्यावर जॅकेट गुंडाळलेलं, चपला गायब आणि मोबाईलचा पत्ता नाही. कन्नड ग्रामीण पोलिसांसमोर उभं होतं एक असं आव्हान, ज्याचा मास्टरमाईंड होता केवळ 18 वर्षांचा एक तरुण, ज्याने पोलिसांना चकवण्यासाठी चक्कक्राईम पेट्रोल आणि ‘द़ृश्यम’ चित्रपटाचा आधार घेतला होता.
जामडी गावातील सरपंचाचा पुतण्या राजू रामचंद्र पवार हा गावातील वंदना पवार (45) हिच्यावर वाईट नजर ठेवून होता. राजू वारंवार वंदनाकडे शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. वारंवार होणारी शारीरिक संबंधांची मागणी आणि मानसिक छळामुळे वंदना हतबल झाली होती. तिने ही व्यथा आपला 18 वर्षीय मुलगा धीरज ऊर्फ टेमा याला सांगितली. संतापाने पेटलेल्या माय-लेकांनी ठरवलं- आता याचा कायमचा काटा काढायचा ! त्यानुसार धीरजने ही हत्या एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे प्लॅन केली होती.
13 जानेवारीला वंदनाने राजूला शेतात बोलावून घेतले, राजू तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या धीरजने त्याच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. राजू रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. वंदनाने पुढचे काम पूर्ण करून राजूला एकदाचा संपवून टाकला. हा गुन्हा पचविण्यासाठी धीरजने गुन्ह्यापूर्वी तासनतास इंटरनेटवर वेगवेगळ्या गुन्हे पद्धती सर्च करून सखोल अभ्यास केला होता. खून केल्यावर मोबाईल कसा ट्रेस होऊ नये? पुराव्यांची विल्हेवाट कशी लावायची? पोलिसांची दिशाभूल कशी करायची, याची इत्थंभूत माहिती त्याने इंटरनेटवरून मिळविली होती. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची हिस्ट्री तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला.
वंदना आणि धीरज यांची चौकशी झाली तेव्हा त्यांनी पोलिसांना चक्रावून टाकले. धीरज आत्मविश्वासाने म्हणाला, साहेब, मी तर गावात नव्हतोच, माझे लोकेशन तपासा हवं तर ! त्याने पोलिसांना फसवण्यासाठी आईच्या मोबाईलचे सिमकार्ड स्वतःच्या फोनमध्ये टाकून तो फोन लांब ठेवून दिला होता, जेणेकरून तांत्रिक तपासात ते दोघे गुन्ह्याच्या ठिकाणी नसल्याचे सिद्ध होईल. त्याने मृताची अंडरपँट, चप्पल आणि मोबाईल वेगवेगळ्या दिशांना फेकले होते, जेणेकरून तपास भरकटत राहील.
सलग सात दिवस पोलिस अंधारात चाचपडत होते; पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एक चूक नक्कीच करतो. एका खबर्याने पोलिसांना वंदनाच्या त्यादिवशी शेताच्या परिसरातील संशयास्पद हालचालींची माहिती दिली. जेव्हा पोलिसांनी वंदना आणि धीरजला समोरासमोर बसवून पोलिसी खाक्या दाखवला, तेव्हा धीरजचा द़ृश्यम प्लॅन कोलमडला. आईने गुन्ह्याची कबुली दिली आणि एका क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा झाला. चित्रपट आणि वेबसीरिज पाहून पोलिसांना चकवा देता येईल, हा धीरजचा भ्रम तुटला. आज हे माय-लेक गजाआड आहेत; पण या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली होती. अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, निरीक्षक विजयसिंग राजपूत, सपोनि रामचंद्र पवार, पवन इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांनी तांत्रिक पुराव्यांची आणि मानवी कौशल्यांची सांगड घालून हा गुन्हा उघड केला.